देशातील करोना रुग्णांचा आकडा ८१ हजारहून अधिक झाला असून शुक्रवारी तो ८१,९७० इतका होता. गेल्या चोवीस तासांमध्ये ३,९६७ नव्या रुग्णांची भर पडली असून १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू २,६४९ झाले आहेत. जगभरात मृत्यूचे प्रमाण ६.९२ टक्के इतके असले तरी भारतात ते सध्या ३.२३ टक्के आहे. एकूण २७,९२० रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये १,६८५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३४.०६ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

Live Blog

21:32 (IST)16 May 2020
मुंबईहून परतलेली वाशिम जिल्ह्यातील महिला करोनाबाधित

मुंबईहून परतलेल्या वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील महिलेला करोनाची लागण झाली आहे. त्या महिलेचा करोना तपासणी अहवाल मुंबई येथेच सकारात्मक आला. मूळ मालेगाव तालुक्यातील व कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील महिलेला करोना संसर्गाची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे या कुटुंबाने स्वत:हून मुंबई येथील खासगी वैद्याकीय प्रयोगशाळेत महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी दिले.

या तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच हे कुटुंब मुंबई येथून वाशिमकडे रवाना झाले. मात्र, वाशीम जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वीच त्या महिलेचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आल्याचे कळले. त्यामुळे हे कुटुंब थेट वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यांचा वाशीम जिल्ह्याात इतर कोणाशी संपर्क आलेला नाही. करोनाबाधित महिलेसोबत मुंबई येथून आलेल्या इतर व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

21:26 (IST)16 May 2020
लॉकडाउनमुळे कर्जात बुडालेल्या टीव्ही अभिनेत्याची आत्महत्या

टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लॉकडानमुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याने तसंच डोक्यावर कर्ज असल्याने मनमीत ग्रेवाल तणावात होता. आर्थिक अडचण निर्माण झाल्याने मनमीत ग्रेवाल याने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. मनमीत नवी मुंबईमधील खारघर येथील फ्लॅटमध्ये आपल्या पत्नीसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घऱातच गळफास घेत त्याने आपलं आयुष्य संपवलं. मनमीतने सब टीव्ही चॅनेलवरील ‘आदत से मजबूर’ तसंच अ‍ॅण्ड चॅनेलच्या ‘कुलदीपक’ या मालिकेत काम केलं होतं. (सविस्तर वृत्त)

21:16 (IST)16 May 2020
महाराष्ट्रात १६०६ नवे करोना रुग्ण, संख्या ३० हजारांच्याही पुढे

महाराष्ट्रात आज १६०६ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या आज ३० हजार ७६ इतकी झाली आहे अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज राज्यात ५२४ करोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ७ हजार ८८ रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. सध्या राज्यात २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

20:59 (IST)16 May 2020
अकोल्यात ‘लपवाछपवी’चा प्रकार ठरला घातक

अकोला शहरात करोनाच्या संसर्गाने  वेग धरला आहे. गेल्या २० दिवसांत करोनाबाधितांची मोठी संख्या नोंदवण्यात आली. दररोज सरासरी १० रुग्ण आढळून येत आहेत. राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. शहरात संशयितांकडून झालेल्या ‘लपवाछपवी’ च्या प्रकारामुळे समूह संक्रमण चांगलेच वाढले. त्यामुळे अकोलेकरांवरील चिंतेचे काळे ढग अधिक गडद झाले आहेत.

विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. अकोला शहर करोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. अकोल्यात ७ एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आला. पुढील ४० दिवसांत ही संख्या २२० वर पोहोचली. शहरात करोनाची लागण झाल्यावरही अगोदरच्या काही दिवसांमध्ये रुग्ण संख्या स्थिर होती. मात्र, २८ एप्रिलपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. गेल्या २० दिवस सलग मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात करोना दाखल झाल्यावर पहिल्या २० दिवसांमध्ये रुग्ण संख्या १७ होती, पुढच्या २० दिवसांमध्ये त्यात तब्बल २०३ रुग्णांची भर पडली. १६ मेपर्यंत जिल्ह्यात एकूण २२० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

20:59 (IST)16 May 2020
पुण्यात एकाच दिवसात 202 रुग्ण आढळले

पुणे शहरात दिवसभरात 202 करोना बाधित रुग्ण आढळले. यासोबत रुग्णसंख्या 3 हजार 295 इतकी झाली आहे. याच दरम्यान 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून 185 मृतांची संख्या झाली आहे.  14 दिवसानंतर 68 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज अखेर 1 हजार 698 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

20:58 (IST)16 May 2020
मुंबईत ८८४ नवे करोना रुग्ण, संख्या १८ हजारांच्याही पुढे

मुंबईत ८८४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या आता १८ हजार ३९६ इतकी झाली आहे. आज २३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ६९६ झाली आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

20:41 (IST)16 May 2020
Coronavirus: पंजाबमधील कर्फ्यू हटवणार, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची घोषणा

करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला कर्फ्यू हटवण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. मात्र यावेळी लॉकडाउन कायम ठेवण्यात येणार आहे. पंजाब सरकारने राज्यात लॉकडाउन ३१ मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने लोकांना लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला असल्याने प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती केली आहे. (सविस्तर वृत्त)

20:02 (IST)16 May 2020
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९ जण करोना पॉजिटिव्ह

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९ जण करोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण करोना बाधितांची संख्या १९५ वर पोहचली असून ११९ जण करोनामुक्त झालेले आहेत. पैकी दोन जणांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आज आढळलेले करोना बाधित रुग्ण हे चिंचवड स्टेशन, रुपीनगर, ताडीवाला रोड, फुगेवाडी आणि पिंपळे सौदागर या परिसरातील आहेत. औंध उरो जिल्हा रुग्णालयात ५९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ते पुण्यात वास्तव्यास होते.

19:54 (IST)16 May 2020
“उत्तर प्रदेश सीमेवर बेकायदेशीर येणाऱ्यांना प्रवेश देऊ नका”, योगी आदित्यनाथ सरकारचे आदेश

उत्तर प्रदेशात अनेक स्थलांतरित मजुरांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनांनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी आदेश देताना जिल्हाधिकाऱ्यांना कोणत्याही परवानगीविना राज्यात प्रवेश कऱणारी वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत अशा वाहन मालक आणि चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचाही आदेश देण्यात आला आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी मजुरांना आपल्या घरी पाठवण्यासाठी एक योग्य व्यवस्था करण्याची गरज असून त्यांच्या अन्न आणि पाण्याची काळजी घेतली पाहिजे असंही सांगितलं आहे. (सविस्तर वृत्त)

18:57 (IST)16 May 2020
कोल्हापूरकरांना दिलासा

आज सायंकाळी, एकूण तीन रुग्णांना त्यांचे सलग २ फॉलो अप स्वाब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये आकुर्डे येथील एक रुग्ण, आंध्र प्रदेशात जाऊ इच्छिणारा एक रुग्ण आणि कनन नगर येथील एक रुग्ण यांचा समावेश आहे.

18:29 (IST)16 May 2020
करोना संकटाचा सामना करण्यासाठी अझीम प्रेमजी यांचा मोदी सरकारला महत्त्वाचा सल्ला

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजची सविस्तर माहिती देत पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी निर्मला सीतारामन यांनी स्थलांतरित मजूर आणि शेती क्षेत्रासंबंधी केलेल्या घोषणांवर बोलताना आयटी कंपनी विप्रोचे अध्यक्ष आणि  संस्थापक अझीम प्रेमजी यांनी मनरेगाचा विस्तार करण्याचा निर्णय सर्वात महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांना गरीब कुटुंबाना तात्काळ मदत करण्याचा सल्लाही दिला आहे. अझीम प्रेमजी यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी ११२५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. (सविस्तर वृत्त)

17:17 (IST)16 May 2020
कोल्हापूर : संस्थात्मक विलगीकरण कक्षातील तरुणाकडून तरुणीचा विनयभंग

संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन) कक्षामध्ये राहणाऱ्या तरुणाने तिथेच क्वारंटाइन असलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याला स्वतंत्र पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त वाचा

17:01 (IST)16 May 2020
जीवनावश्यक सेवा वगळता पालघर शहरातील सर्व दुकाने बंद

टाळेबंदीत पालघर नगरपरिषद क्षेत्रात एका रांगेत वेगवेगळी पाच दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तरीही हे नियम धाब्यावर बसवून अनेक दुकानं सुरू असल्याचे व त्या ठिकाणी टाळेबंदीचे नियम पाळले जात नसल्याने निदर्शनास आल्याने नगरपरिषदेने ही गर्दी कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सविस्तर वृत्त वाचा

16:36 (IST)16 May 2020
धक्कादायक! हत्या झालेला १५ वर्षीय तरुण आढळला करोना पॉझिटिव्ह, २२ जण क्वारंटाइन

तीन दिवसांपूर्वी आढळलेला १५ वर्षीय मृत तरुण करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर २२ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. लुधियाना येथे रेल्वेच्या एका पडक्या इमारतीत हा मृतदेह आढळला होता. तरुणाच्या डोक्यावर काही गंभीर जखमा आढळल्या आहेत. पीडित तरुण खासगी शाळेत आठवीत शिकत होता. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (सविस्तर बातमी)

16:19 (IST)16 May 2020
राज्यातून १९१ ट्रेनद्वारे अडीच लाख परप्रांतीय कामगारांना पाठवलं स्वगृही - अनिल देशमुख

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी आजपर्यंत १९१ रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. यातून २, ४५, ००० स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आलं आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, जम्मू-काश्मिर आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील कामगारांचा समावेश आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. सविस्तर बातमी वाचा

15:43 (IST)16 May 2020
भारताने लॉकडाउननंतर रेड लाइट ठिकाणे बंद ठेवल्‍यास टळू शकतो करोनाचा धोका

लॉकडाउननंतर मुंबईतील रेड लाइट ठिकाणे बंद ठेवल्‍यास करोनाच्या २१ टक्‍के केसेस टाळता येऊ शकतील असा दावा येल स्‍कूल ऑफ मेडिसीन व हार्वर्ड मेडिकल स्‍कूलमधील शिक्षणतज्ञांच्‍या अहवालात करण्यात आला आहे. मुंबईतील रेड लाइट ठिकाणे बंद केल्‍यास ६० दिवसांमध्‍ये करोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूचे प्रमाण २८ टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. देशभरात याची अमलबजावणी केल्‍यास ४५ दिवसांमध्‍ये करोनाच्‍या केसेसमध्‍ये ७२ टक्‍क्‍यांनी घट होऊ शकते आणि ६० दिवसांमध्‍ये मृत्‍यूंचे प्रमाण ६३ टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते. तसंच लॉकडाउनपासून वाढत असलेल्‍या केसेसच्‍या प्रमाणामध्‍ये १७ दिवसांचे अधिक अंतर निर्माण होऊ शकते असंही अहवालात सांगण्यात आलं आहे. (सविस्तर वृत्त)

15:12 (IST)16 May 2020
मुंबई : कांद्याच्या वाहतुकीतून गुटख्याची तस्करी; २० लाखांचा माल जप्त

राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही तो बेकायदापद्धतीने इथं दाखल होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. विरार येथील वालीव पोलिसांनी नुकत्याच केलेल्या एका कारवाईत कांद्याच्या वाहतुकीतून आणण्यात आलेला गुटखा पकडला आहे. या कारवाईत २० लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक करीत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

14:10 (IST)16 May 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींच्या पॅकेजवर पुनर्विचार करावा – राहुल गांधी

वादळ अजून आलेलं नाही, ते येत आहे. पण ते आल्यावर मोठा आर्थिक फटका बसणार असून अनेकांना तो सहन करावा लागणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला जाहीर करण्यात आलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर पुनर्विचार करावा असा सल्लाही दिला आहे. शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे द्या या मागणीचा यावेळी त्यांनी पुनरुच्चार केला. राहुल गांधी यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. (सविस्तर वृत्त)

14:00 (IST)16 May 2020
'लावा' कंपनी चीनमधील व्यवसाय गुंडाळणार; भारतात करणार ८०० कोटींची गुंतवणूक

मोबाईलचं उत्पादन करणारी 'लावा' या कंपनीनं आपला चीनमधील व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. लावा इंटरनॅशनलकडून शुक्रवारी यासंदर्भातील माहिती देण्यात आली. भारतात करण्यात आलेल्या धोरणात्मक बदलांनंतर कंपनीनं आपला व्यवसाय भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं मोबाईल फोन डेव्हलपमेंट आणि उत्पादन वाढीसाठी पुढील पाच वर्षात भारतात ८०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

13:32 (IST)16 May 2020
पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी क्वारंटाइनमधून पळाला, घरी पोहोचला आणि…

क्वारंटाइन सेंटरमधून पळालेल्या एका स्थलांतरित मजुराने घरी पोहोचल्यानंतर थेट पत्नीवर हल्ला केला. छत्तीसगडच्या जाशपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. दुसऱ्या राज्यातून आल्यामुळे या मजुराला क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. वाचा सविस्तर बातमी.

13:26 (IST)16 May 2020
पुण्यात 'मे' अखेरपर्यंत ५,००० करोनाबाधित रुग्ण असतील - महापालिका आयुक्त

पुणे शहरात करोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. मागील पंधरा दिवसांपूर्वी शहरात आढळणार्‍या रुग्णांची संख्या लक्षात घेता ती मे अखेरपर्यंत ९ हजाराहून अधिक होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सध्या करोनाबाधित आणि डिस्चार्ज रुग्णांची संख्या लक्षात घेता मे अखेरपर्यंत ही रुग्णसंख्या सुमारे ५ हजारांपर्यंत असेल, अशी शक्यता महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली. सविस्तर वृत्त वाचा

12:34 (IST)16 May 2020
गोवंडी शिवाजी नगरमध्ये केंद्रीय सशस्त्र दल तैनात करा – किरीट सोमय्या

मुंबईत करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गोवंडी शिवाजी नगर भागात केंद्रीय सशस्त्र दलाची तैनाती करण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर बातमी.

11:58 (IST)16 May 2020
मुंबई पोलीस दलामध्ये करोनाचा आठवा बळी!

करोनाच्या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाउनच्या काळात कायदा, सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाही आता या विषाणूनं विळखा घातला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई दलात आज (शनिवारी) आठवा बळी गेला. त्यामुळे पोलीस दलातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सविस्तर बातमी वाचा

11:03 (IST)16 May 2020
कोल्हापूरात आढळले सहा नवे करोना पॉझिटिव्ह; सर्वजण मुंबईहून आलेले प्रवासी

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी एकाच वेळी करोनाचे सहा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे हे सर्वजण मुंबईहून आलेले इथले स्थानिक नागरिक आहेत. मुंबईहून आलेल्या या प्रवाशांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३५ वर पोहचली आहे. सविस्तर वृत्त वाचा

10:37 (IST)16 May 2020
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा...; प्रविण दरेकर यांचा इशारा

देशात आणि राज्यात सुरू असलेल्या करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनमधून अत्यावश्यक सेवांना मात्र वगळण्यात आलं आहे. बेस्टलादेखील अत्यावश्यक सेवांमध्ये सामिल करण्यात आल्यानं बेस्टची सेवाही सुरू आहे. अशा परिस्थितीत काही बेस्ट कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी काही मागण्या केल्या होत्या. 'बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्हालाही मानवतेच्या भावनेतून त्यांच्यासोबत आंदोलनात उतरावं लागेल,' असा इशारा भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.

09:57 (IST)16 May 2020
अर्थमंत्री सीतारामन करणार आर्थिक पॅकेजमधील नव्या घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी त्या आर्थिक पॅकेजसंबंधी आणखी काही घोषणा करणार आहेत. 

09:25 (IST)16 May 2020
सोलापूरात आढळले नवे १७ करोनाबाधित रुग्ण

सोलापुरात आज सकाळी नवे १७ करोनाबाधित रूग्ण आढळून आले. यात दहा पुरूष व सात महिला आहेत. यामुळे सोलापुरातील एकूण रूग्णसंख्या ३६० वर पोहोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात करोनाशी संबंधित १४८ रूग्णांची चाचणी घेण्यात आली. त्यात १७ रूग्ण करोना पॉझिटिव्ह सापडले. आतापर्यंत करोनाने घेतलेल्या बळींची संख्या २४ इतकी झाली आहे. तर करोनामुक्त झालेल्यांची संख्या ११३ झाली आहे.

08:53 (IST)16 May 2020
तूर्तास मुंबईहून कोल्हापूरकडे प्रवासी पाठवू नका; सतेज पाटील यांचं पोलीस महासंचालकांना पत्र

मुंबईहून झपाट्याने येणाऱ्या प्रवाशांचा भार कोल्हापूरला सोसेना झाला आहे. कोल्हापुरात आलेल्या ८६ हजार रुग्णांच्या तपासणी करण्याचे काम प्रलंबित आहे. अशात नव्याने प्रवाशांची भर पडणे हो सोसणारं नाही. त्यामुळे मुंबईतून कोल्हापूरला येण्यासाठी काही दिवस परवानगी देऊ नये, अशी मागणी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.

08:37 (IST)16 May 2020
अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार असल्याचेही सांगितले आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की अमेरिका आमच्या  मित्र देश भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार आहे. या महामारीच्या काळात आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही करोनाविरोधात लस विकसित करण्यासाठी सहकार्य करत आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र येवून या अदृश्य शत्रूचा पराभव करु; असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

08:29 (IST)16 May 2020
करोनाच्या रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण कमी करण्यात यश

करोनासंदर्भातील १५ व्या मंत्रिगटाची बैठक शुक्रवारी झाली. ही बैठक केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाळेबंदीमुळे करोनाच्या रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे. टाळेबंदी लागू करण्यापूर्वी हे प्रमाण ३.४ दिवस होते पण, आता ते १२.९ दिवसांवर पोहोचले आहे.

08:27 (IST)16 May 2020
उत्तर प्रदेश: दोन ट्रकचा भीषण अपघात; २३ मजूर जागीच ठार

लॉकडाउन सुरु असल्याने घराकडे निघालेल्या २३ मजुरांचा उत्तर प्रदेशमधील औरैयामध्ये झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. यापैकी एका ट्रकमध्ये ८१ मजूर असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी २३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० जण गंभीर जखमी असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.येथे वाचा सविस्तर वृत्त