जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे आजपर्यंत (१८ एप्रिल २०२०) जगभरामध्ये २२ लाखांहून अधिक जणांना याचा संसर्ग झाला असून मरण पावलेल्यांची संख्या दीड लाखांहून अधिक आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र असं असतानाही अनेकजण लॉकडाउनच्या नियमांचे उल्लघन करुन स्वत:बरोबरच इतरांचा जीवही धोक्यात टाक आहेत. अशा लोकांसाठी नेटकऱ्यांनी ‘कोवीडीयोट्स’ म्हणजेच कोवीड पसरवणारे वेडे हा शब्द शोधून काढला आहे.

लॉकडाउनचे उल्लंघन करणारे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे अनेक लोकं कोवीड पसरवणारे वेडे असतात असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. बरं हे केवळ एकाच देशात आहेत असं नाही. जगभरामधील अनेक देशामध्ये सर्वाजनिक ठिकाणी कारण नसताना गर्दी करुन स्वत:बरोबरच समाजाचे आयुष्य धोक्यात घालणारे वेडे लोकं सहज सापडतात. अमेरिकेमध्ये तर अशाच काही लोकांनी लॉकडाउन उठवावा या मागणीसाठी चक्क सशस्त्र आंदोलन केल्याचे वृत्त समोर आलं आहे.

करोनाचा सर्वाधिक फटका बसलेले शहर म्हणजे न्यूयॉर्क. न्यूयॉर्कमध्ये करोनामुळे आतापर्यंत आठ हजार ८०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. मात्र असं असतानाही येथील लॉकडाउन उठवण्याची मागणी काहीजणांकडून केली जात आहे. न्यूयॉर्कबरोबरच व्हर्जिनीयामध्ये काही तरुण हातामध्ये शस्त्र घेऊन ‘अ‍ॅण्टी लॉकडाउन प्रोटेस्ट’ म्हणजेच लॉकडाउनविरोधी आंदोलन करताना दिसले. अमेरिकेत करोनाचा फैलाव वेगाने होत असतानाच राज्यपालांनी शहरामधील काही भागांमधील बंदी उठवावी अशी या आंदोलकांची मागणी आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या आंदोलकांनी अमेरिकेतील वेगवेगळ्या सेवा पुन्हा सुरु करण्याची म्हणजेच #ReOpenAmerica अशी मागणी केली आहे. बुधवारपासून देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशी आंदोलने केली जात आहेत. ओहियो, नॉर्थ कॅरलॉना, मिशिगन आणि केंटुकीसारख्या भागांमध्ये अनेक नागरिक रस्त्यावर उतल्याचे चित्र पहायला मिळाले. या नागरिकांनी हातामध्ये लॉकडाउन संपवण्यासंदर्भातील बोर्ड पकडलेले होते. यामध्ये ‘भिती घालवा, लॉकडाउन हटवा’, ‘स्वतंत्रपणे जगू किंवा मरु’ अशी वाक्य लिहिलेली होती.

मिशिगन, केंटुकीमधील अनेक आंदोलक हे ट्रम्प यांचे समर्थक असल्याचे वृत्त अनेक वेबसाईटने दिले आहे. मिशिगनमध्ये १० पेक्षा अधिक लोकांनी एका ठिकाणी जमू नये असे आदेश असतानाही अनेकजण या लॉकडाउनविरोधी आंदलोनामध्ये सहभागी झाल्याचे पहायला मिळाले, असं ‘व्हॅनिटीफेअर डॉट कॉम’ने (vanityfair) आपल्या वृत्तात म्हटलं आहे. या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांपैकी अनेक जण हे तोंडावर मास्क घालून होते. या तरुणांच्या हातामध्ये एआर-१५ आणि एके-४७ सारख्या बंदुका असल्याचे अनेक वेबसाईटने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.