जगभरामध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटनला करोनाचा चीनहून अधिक फटका बसला आहे. अशाच अनेक देशांमध्ये करोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. मात्र ही लस शोधण्यासाठी एक ते दीड वर्ष लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगभरातील संशोधक या करोनारुपी संकटावर मात करण्यासाठी लस निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अस असतानाच आता ऑस्ट्रेलियामधील संशोधकांनी, जगभरामध्ये उपलब्ध असणाऱ्या एका अ‍ॅण्टी पॅरासायटीक (परजीवी विरोधी) औषधाच्या मदतीने सेल कल्चर (मानवी पेशींवर समुहाने होणारी करोना विषाणूची वाढ) ४८ तासांमध्ये नष्ट करता येईल असा दावा केला आहे. या संशोधनामुळे वैज्ञानिकांना करोनावर लस बनवण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

जगप्रसिद्ध संशोधन नियतकालिक असणाऱ्या ‘अ‍ॅण्टीव्हायर रिचर्स’मध्ये छापून आलेल्या एका अभ्यासाच्या अहवालानुसार, आइवरमेक्टीन (Ivermectin) या औषधाने प्रयोगशाळेमध्ये निर्माण करण्यात आलेल्या करोनाच्या कोवीड-१९ विषाणूचा खात्मा केला. या प्रयोगामध्ये सहभागी झालेल्या मोनाश विद्यापिठाच्या काइली वॅगस्टाफ यांनी दिलेल्या माहिनुसार, आइवरमेक्टीनचा एक डोस करोनाच्या आरएनएला (मानवामध्ये डीएनए असतो तसा विषाणूंमध्ये आरएनए असतो) ४८ तासांमध्ये संपवू शकतो. इतकचं नाही तर अवघ्या २४ तासांमध्ये या औषधाच्या मदतीने करोनाच्या विषाणूचा नाश करता येईल असंही या अहवालामध्ये म्हटलं आहे.

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आइवरमेक्टीनला जगभरातील वेगवेगळ्या देशातील सरकारांनी मान्यता दिली आहे. हे औषध सध्या इतर विषाणूंमुळे झालेल्या आजारावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये प्रामुख्याने एचआयव्ही, डेंग्यू, झिका व्हायरस आणि इन्फ्युएंजासारख्या विषाणूंचा समावेश होतो. “या चाचण्या सध्या केवळ प्रयोगशाळेमध्ये करण्यात आल्या आहेत. त्यांचा मानवावरील प्रयोग अजून बाकी आहे. मात्र आइवरमेक्टीन हे एक सुरक्षित औषध म्हणून अनेक ठिकाणी वापरणे शक्य आहे. आता करोनाग्रस्तांवर या औषधाच्या डोसचा कसा परिणाम होतो हे आपल्याला पहावे लागणार आहे,” असं मत वॅगस्टाफ यांनी व्यक्त केलं.

चीनच्या बाहेर करोनाव्हायरच्या स्ट्रेनचे विलगीकरण करण्यामध्ये ज्या संशोधकांच्या गटाला यश आलं होतं त्या संशोधकांमध्ये एक व्हायरोलॉजिस्ट म्हणून रॉयल मेलबर्न हॉस्पीटलच्या लिऑन कॅली यांचाही सहभाग होता. “आइवरमेक्टीनला करोनावरील उपचारासाठी वापर केला जाण्याबद्दल मी आशावादी आहे. मात्र त्याआधी प्री क्लिनिकल टेस्टींग आणि चाचण्यांमध्ये काय दिसून येते हे सुद्धा आपल्याला पहावं लागेल,” असं मत कॅली यांनी व्यक्त केलं. त्यामुळेच हे औषध जगभरामध्ये उपलब्ध असलं त्याच्या वापराला सरकारची परवानगी असली तरी अद्याप त्याच्या मानवी शरीरावर चाचण्या होणं बाकी आहे. या चाचण्यांमधून जे निष्कर्ष समोर येतील त्याच्या आधारेच मोठ्या प्रमाणात हा औषधाचा वापर करता येईल की नाही हे स्पष्ट होईल, असं जाणकार सांगतात.