दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभरातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवला जावा असा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही ठराविक राज्यांमध्ये लॉकडाउन न वाढवता, संपूर्ण देशभरात लॉकडाउन वाढवला गेला पाहिजे असं मत मांडलं.

एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. “लॉकडाउन संपूर्ण देशात वाढवला पाहिजे. एखाद्या राज्यातून लॉकडाऊन हटवणं आणि एखाद्या राज्यात सुरु ठेवणं योग्य नाही,” असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. हा लॉकडाउन उठवला जाणार की वाढवला जाणार याबद्दल सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाउन वाढवला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली असून यानंतर आता नरेंद्र मोदी काय निर्णय़ जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अनेक राज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लॉकडाउन वाढवला जावा अशी मागणी केली असल्याचं कळत आहे. महत्त्वाचं म्हणजे ओडिशा राज्याने तर आधीच एप्रिल अखेपर्यंत लॉकडाउन जाहीर करुन टाकला आहे. तसंच पंजाब सरकारनेही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये १ मेपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लॉकडाउन वाढवण्याचे संकेत दिले होते. पंजाबमध्ये Covid-19 चाी लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पंजाबमध्ये १०० पेक्षा जास्त नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारी म्हणून लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.