करोनाविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पश्चिम बंगालमधील महिला अधिकाऱ्याचा करोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. देवदत्ता रे असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. हुगली जिल्ह्यातील चंदननगर उपविभागात उपदंडाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांच्या मागे पती आणि चार महिन्यांचा मुलगा आहे.

३८ वर्षीय देवदत्ता रे यांना करोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर घरातच क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं होतं. रविवारी त्यांची प्रकृती ढासळली असता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी करोनाविरोधातील लढाईत त्यांना अपय़श आलं आणि निधन झालं.

देवदत्ता रे यांच्यावर ट्रेनमधून बंगालमध्ये परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांची जबाबदारी होती. बंगालमध्ये पोहोचल्यावर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवत ज्या पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळली होती त्याचं सर्वांकडून कौतुक केलं जात होतं.

आणखी वाचा- ट्रॅक्टरमधून स्वतः डॉक्टरच घेऊन गेले करोनाग्रस्ताचा मृतदेह, म्हणाले..”जे केलं ते माझं कर्तव्य”

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील देवदत्ता रे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

देवदत्ता रे यांनी २०१० मधील बॅचच्या अधिकारी होत्या. चंदननगर येथे बदली होण्याआधी पुरुलिया येथे त्या गटविकास अधिकारी होत्या. देवदत्ता रे यांच्या निधनाने त्यांच्या सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.