करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी करोना लस विकसित करणाऱ्यांमध्ये भारत बायोटेकदेखील आघाडीवर आहे. मात्र नुकतंच भारत बायोटेकने स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनबीसी-टीव्ही १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी याआधी ७५० स्वयंसेवकांवर चाचणी करणार होती, पण आता फक्त ३८० स्वयंसेवकांना लसीचे डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय चाचणी घेतली जाणाऱ्या साइट्सची संख्याही कमी करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यातील स्वयंसेवकांमधील सेरोकोव्हर्जन किंवा इम्यूनोजेनिसिटीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात ३७५ निरोगी स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन लसीचा डोस देण्यात आला होता. सध्या स्वयंसेवकांना डोस देण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची प्रक्रिया सुरु होती. स्वयंसेवकांना ताप आणि शारिरीक वेदना याशिवाय इतर कोणताही मोठा त्रास जाणवला नसल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

कोव्हॅक्सिन ही एक 2-डोसची लस असून १४ दिवसांच्या अंतराने दिली जाण्याची योजना आहे. दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील डेटा अद्याप प्रसिद्ध किंवा सार्वजनिक करण्यात आलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणी संख्या कमी केल्याने दुसऱ्या टप्पा लवकर संपेल आणि तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. यामुळे कोव्हॅक्सिनच्या वैद्यकीय चाचणीचा संपूर्ण कालावधीदेखील कमी होईल. भारतात सध्या तीन लस वैद्यकीय टप्प्यात असून प्राथमिक निष्कर्ष हाती येण्यामध्ये जानेवारी उजाडेल आणि अंतिम निकाल मार्चच्या अखेर हाती येईल असं तज्ञांचं म्हणणं आहे.

टाइमलाइन कमी केल्याने कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होण्याचा वेग वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत बायोटेक इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) सोबत मिळून कोव्हॅक्सीन लसीची निर्मिती करत आहे.