महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांमध्ये अडकलेल्या बिहारच्या कामगारांना परत आणण्यासंदर्भात बिहार सरकारने रेल्वे प्रशासनाकडे विशेष गाडी सोडण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील माहिती बिहारमधील एका मंत्र्याने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.  लॉकडाउननंतर वेगवगेळ्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांना स्वत:च्या राज्यामध्ये पाठवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याच्या मागण्या वेगवेगळ्या राज्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केल्या आहेत. तेलंगण राज्याच्या मागणीच्या आधारावर आज (१ मे २०२० रोजी) हैदराबादजवळील लिंगमपिल्ली येथून झारखंडमधील हटियासाठी कामगारांना घेऊन जाणारी विशेष गाडी सोडण्यात आली.  २५ मार्चपासून देशामध्ये लॉकडाउन सुरु झाल्यानंतर आज पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे. या वृत्तानंतरच बिहारमधील मंत्र्याने केंद्राकडे अशाच विशेष रेल्वे गाड्या महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यामधून बिहारमध्ये सोडण्यात याव्यात अशी मागणी केल्याची माहिती दिली आहे.

नक्की वाचा >> लॉकडाउननंतर आज पहिली विशेष रेल्वे धावली; कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी निर्णय

२५ मार्चपासून देशामध्ये लॉकडाउन सुरु झाल्यानंतर आज पहिल्यांदाच तेलंगण ते झारखंडदरम्यान प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे. त्यानंतर एएनआयशी बोलताना बिहारमधील मंत्री संजय झा यांनी एएनआयला अशाप्रकारची मागणी बिहार सरकारने केल्याची माहिती दिली. “स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दुसऱ्या राज्यामध्ये अडकून पडले आहेत. आम्ही केंद्राकडे विशेष रेल्वे गाडी सोडण्याची मागणी केली आहे. बसमधून या लोकांना आणण्याचा विचार केल्यास रेल्वेच्या केवळ एक एक तृतीयांश लोकांइतकीच बसची क्षमता असते. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि इतर अनेक ठिकाणी बिहारमधील लोकं अडकून पडली आहेत. त्यांना सुरक्षित परत आणणे महत्वाचे आहे,” असं संजय झा यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारनेही मुंबईबरोबरच राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये अडकलेल्या बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यात परत जाता यावे यासाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्याची मागणी याआधीच केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी जनतेशी संवाद साधताना भाष्य केलं होतं. मुंबईमध्ये अडकून पडलेल्या उत्तर भारतामधील हजारो कामगारांनी १४ एप्रिल रोजी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आल्याची घोषणा झाल्यानंतर वांद्रे स्थानक परिसरामध्ये गर्दी केली होती. वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारोंचा जमाव मोठ्या संख्येने जमला होता. लॉकडाउनचा विरोध करत अनेक कामगारांनी गावी जाण्यासाठी विशेष गाडी सोडण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी कारवाई करत हा जमाव पांगवला होता. मात्र यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. मात्र आता तेलंगणमधून झारखंडसाठी गाडी सोडण्यात आल्यानंतर महाराष्ट्राबरोबर बिहार सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकार मुंबईत अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी विशेष गाडी सोडणार का हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.