पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट बंद करत नऊ मिनिटांसाठी दिवा लावून एकतेचं दर्शन घडवण्याचं आवाहन केलं होतं. मोदींनी केलल्या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आपल्या घराच्या गॅलरी, खिडकी, दरवाजात दिवा लावला आणि एकतेचा संदेश दिला. दरम्यान तेलंगणमध्ये भाजपा आमदाराने तर थेट रॅली काढली आणि चायनीज व्हायरस गो बॅकच्या घोषणा दिल्या.

राजा सिंग तेलंगणमधील भाजपाचे एकमेव आमदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करताना सांगितलं होतं की, घरातील सर्व लाइट बंद करा आणि दिवा, मेणबत्ती किंवा मोबाइल टॉर्च नऊ मिनिटांसाठी लावा. मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना राजा सिंग यांनी थेट मशाली पेटवल्या आणि समर्थकांसोबत रॅली काढली. यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थकही उपस्थित होते.

हातात मशाली घेऊन रॅली काढल्यानंतर राजा सिंग आणि त्यांचे समर्थक ‘गो बॅक, गो बॅक चायनीज व्हायरस गो बॅक’च्या घोषणा देत होते. राजा सिंग भाजपाचे गोशमहल मतदारसंघातील वादग्रस्त आमदार आहेत. राजा सिंग यांच्यासोबत डझनहून जास्त समर्थक उपस्थित होते. राजा सिंग यांनी हातात मशाल पकडली असताना इतरांनी हातात मेणबत्त्या पकडल्या होत्या.

दिवे लावण्याऐवजी तोंडातून आगीचे गोळे काढले, घडली आयुष्यभरासाठीची अद्दल
उज्जैन येथे असंच एका तरुणाने दिवे लावण्याऐवजी तोंडात रॉकेल भरुन आगीचे गोळे काढण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी त्याला आयुष्यभरासाठीची अद्दल घडली आहे. रविवारी रात्री एकीकडे लोक घराच्या गॅलरी, खिडकीत दिवा लावून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना काहीजण मात्र रस्त्यावर उतरले होते. उज्जैन येथे असाच एक तरुण रस्त्यावर उतरुन लोकांना कलाबाजी करुन दाखवत होता. तरुण तोंडात रॉकेल भरुन आगीचे गोळे काढून दाखवत होता. त्याची ही कलबाजी पाहण्यासाठी काही लोकही तिथे उपस्थित होते. मात्र यावेळी त्याच्या चेहऱ्याला आग लागली. त्याच्या सुदैवाने आजूबाजूला काही तरुण उपस्थित होते. ज्यांनी लगेच धाव घेतली आणि त्याच्या चेहऱ्यावरील आग विझवली.