दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना करोनाची लागण झाल्याने केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी संताप व्यक्त केला आहे. तबलिगी जमातच्या बेजबाबदार वागण्यामुळे शेकडो लोकांना करोनाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. मुख्तार अब्बास नकवी यांनी टीका करताना तबलिगी जमातचा हा तालिबानी गुन्हा आहे. त्यांचा हा गुन्हा माफीच्या लायकीचा नाही असं म्हटलं आहे.

नकवी यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “तबलिगी जमातचा तालिबानी गुन्हा. हा बेजबाबदारपणा नाही तर गंभीर गुन्हा आहे. जेव्हा संपूर्ण देश एकत्र होऊन करोनाशी लढा देत आहे तेव्हा अशा गंभीर गुन्ह्याला माफी दिली जाऊ शकत नाही”.

अब्बास नकवी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन इतर मुस्लीम नेत्यांसाठी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मुस्लीम नेत्यांना लोकांना आवाहन करण्याची विनंती केली आहे की, करोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी लॉकडाउन आणि इतर आदेशांचं कठोर पालन करा.

आणखी वाचा- Coronavirus : निझामुद्दीन येथील कार्यक्रमातून बडोद्यात परतलेले पाच जण होम क्वारंटाइन

गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीपासून ते आतापर्यंत जवळपास २१०० परदेशी नागरिकांनी तबलिगी जमातशी संबंधित कार्यक्रमांसाठी भारत दौरा केला. यामधील सर्वांनी दिल्लीच्या निजामुद्दीनचा दौरा केला होता.

आणखी वाचा- तबलिगी मर्कझ : पुण्यातील ६० जण क्वारंटाइनमध्ये, इतरांचा शोध सुरू – जिल्हाधिकारी

अब्बास नकवी यांनी करोना व्हायरसशी लढा देण्यासाठी आपल्या खासदार निधीतून एक कोटी रुपये दिले आहेत. भाजपाने आपल्या सर्व खासदारांना आवाहन केलं आहे की, खासदार निधीतून मिळालेल्या पाच कोटींपैकी एक कोटी रुपये करोनाशी लढा देण्यासाठी मदत म्हणून द्यावेत.