जगातील करोनाबळींच्या संख्येने शुक्रवारी एक लाखाचा आकडा ओलांडला. अमेरिकेमध्येही कोरनाने थैमान घातलं आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत १७८३ लोक मृत्युमुखी पडले आहेत. मात्र, आदल्या दिवशीच्या १९७३ या विक्रमी संख्येपेक्षा ही संख्या कमीच आहे. देशात करोनाने १६ हजार ६८६ बळी गेले असून, जगात इटलीनंतरची ती दुसऱ्या क्रमांकाची संख्या आहे. अमेरिकेतील करोनाबाधितांची संख्या जगात सर्वात जास्त, म्हणजे ४,६६,२९९ इतकी आहे. त्यातही अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. येथे दररोज जवळपास ५०० जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहे. त्यामुळेच येथे मृतदेहांवर सामूहिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जात आहे. याच संदर्भातील काही व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार ज्या रुग्णांचा कोणतेही नातेवाईक नाहीत अशा रुग्णांच्या मृतदेहांवर हार्ट बेटावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. सामूहिक दफनविधीसाठी लांबच लांब आकाराचे मोठे खड्डे खणण्यात आल्याचे व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दिसत आहे. करोनामुळे मृत्यू होण्यास सुरुवात झाली तेव्हा आठवड्यात केवळ एकदा खोदकाम करुन दफनविधीसाठी खड्डे खणले जायचेय मात्र आता येथे आठवड्यातील पाच दिवस काम सुरु असते. आधी हे काम तुरुंगामधील कैद्यांना दिलं जायचं. मात्र मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता थेट कंत्राटदारांना हे काम देण्यात आलं आहे.

अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी अ‍ॅण्ड इंफेक्शीयस डिसीजचे निर्देशक डॉक्टर अँथनी फौसी यांनी अमेरिकेमध्ये करोनामुळे २ लाखांहून अधिक लोकं मरण्याचा दावा खोडून काढला आहे. अमेरिकेमध्ये करोनामुळे ६० हजार जणांचा मृत्यू होईल अशी शक्यता फौसी यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेमध्ये आता सोशल डिस्टन्सिंगचा आणि लॉकडाउनचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे, असं फौसी यांनी म्हटलं आहे. फौसी हे व्हाइट हाऊसच्या करोना विषाणूसंदर्भातील टास्क फोर्सचे सदस्य आहेत.