ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सात एप्रिल रोजी आभार प्रदर्शन करणारे एक पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये बोल्सोनारो यांनी रामायणाचा उल्लेख केला आहे. भारताने हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या निर्यातीचा जो निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद असल्याचं बोल्सोनारो पत्रामध्ये म्हणाले आहेत. भारताच्या या निर्णयाची तुलना बोल्सोनारो यांनी रामायणामधील हनुमानाने लक्ष्मणासाठी संजवीनी औषधी आणण्याच्या प्रसंगाशी केली आहे.

भारताने करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये महत्वपूर्ण समजली जाणारी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन आणि पॅरासीटेमॉल औषधांची निर्यात इतर देशामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ब्राझीलच्या पंतप्रधानांनी हे पत्र पाठवलं आहे.

पत्रात नक्की काय म्हटलं आहे?

ज्याप्रमाणे भगवान हनुमान श्री रामच्या भावाचे म्हणजेच लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हिमालयामधून पवित्र औषध घेऊन आले आणि येशू आजारी लोकांना बरं केलं. त्याचप्रमाणे भारत आणि ब्राझील या जागतिक संकटावर एकत्र काम करुन मात करेल. लोकांच्या भल्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील असं ब्राझीलच्या पंतप्रधानांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे. या पत्रामध्ये ‘पवित्र औषध’ असा ज्याचा उल्लेख आहे त्याला रामायणामध्ये संजीवनी असं म्हटलं आहे. श्रीलंकेमध्ये झालेल्या युद्धामध्ये लक्ष्मण जखमी झाला तेव्हा भगवान रामाच्या सांगण्यानुसार भगवान हनुमानाने संजीवनी औषध हिमालयामधून आणल्याचा उल्लेख रामायणामध्ये आहे.

…आणि भारताने निर्यातीवरील बंदी उठवली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा एप्रिल रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरु संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारताकडे मदत मागितली. भारताने हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवावी अशी मागणीही ट्रम्प यांनी मोदींकडे केली होती. तसेच भारताने निर्यातीवरील बंदी न उठवल्यास यासंदर्भातील परिणामांसर्भातील धमकीवजा इशाराही ट्रम्प यांनी यावेळी दिला होता. “मी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. तुम्ही आम्हाला हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करत आहात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत असं सांगितलं आहे. पण जर त्यांनी पुरवठा केला नसता, तरी काही हरकत नव्हती. पण मग आम्हीही जशास तसं उत्तर दिलं असतं, आणि ते आम्ही का करु नये ?” असे ट्रम्प म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर भारताने हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन आणि पॅरासीटेमॉल औषधांवरील निर्यातीवर असणारी बंदी उठवली आहे.

या औषधाला महत्व का?

अमेरिकेआधी भारताकडे अशीच मागणी शेजरी असणाऱ्या श्रीलंका आणि नेपाळ सरकारनेही केली होती. ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार अमेरिकेमध्ये पुरवल्या जाणाऱ्या एकूण हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधांपैकी अर्ध्याहून अधिक पुरवठा हा भारतीय कंपन्या करतात. मोदी आणि ट्रम्प यांच्या भाषणाआधीच काही आठवड्यांपूर्वी ट्रम्प यांनी करोनाविरुद्ध लढण्यासाठी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन हे औषध गेम चेंजर ठरेल असं मत व्यक्त केलं होतं. मात्र हे औषध करोनावर किती परिणामकारक आहे याबद्दल वैद्यकीय क्षेत्रांमधील तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.