ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. आपल्याला काही लक्षणं जाणवत असून स्वत:ला विलगीकरणात ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याआधी ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनी करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. शाही राजघराण्यातही करोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता पंतप्रधानांनाही करोनाची लागण झाल्याने गांभीर्य वाढलं आहे. मात्र ब्रिटनसारख्या प्रगत देशातील पंतप्रधानांना करोनाचा संसर्ग कसा झाला असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मात्र आता बोरिस यांना करोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीचा त्यांच्या पत्रकार परिषदेमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी एक ट्विट करत मला करोनाची लागण झाली आहे असं सांगितलं. “गेल्या २४ तासांपासून मला काही हलकी लक्षणं जाणवत होती. तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे. आपण सध्या करोना व्हायरसशी लढा देत असून मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सरकारचं नेतृत्व करत राहणार आहे”, असं बोरिस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पण करोना झाला कसा?

मात्र बोरिस यांना करोना कसा झाला यासंदर्भातील प्रश्न अनेकांनी त्यांना ट्विटवर विचारले. यावर चांगलीच चर्चा ही रंगली. मात्र बोरिस यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती दिली. एका करोनाग्रस्त रुग्णाशी हस्तांदोलन केल्याने आपल्याला करोना झाला आहे, अशी शक्यता बोरिस यांनी बोलून दाखवली. “मला लोकांशी हस्तांदोलन करण्याची सवय आहे. मी अनेकांशी हात मिळवतो. काल रात्र मी एका रुग्णालयाला भेट दिली. तेव्हा तेथील काही रुग्णांशी मी हस्तांदोलन केलं. त्यापैकी काहीजण करोनाचे रुग्ण होते,” असं बोरिस यांनी सांगितलं होते. त्यामुळे हे असं हस्तांदोलन केल्यानेच बोरिस यांना करोना झाल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. बोरिस यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी करोनाग्रस्तांशी हस्तांदोलन केल्याची कबुली देणारा  व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

 

करोनाने आतापर्यंत जगभरात २१ हजार जणांचा जीव घेतला असून करोनाची लागण झालेल्या अनेक मोठ्या नेत्यांमध्ये आता बोरिस जॉन्सन यांचा समावेश झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिश राजघराण्याचे सदस्य प्रिन्स चार्ल्स यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांना हलकी लक्षणं दिसत आहेत, पण सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत १२ हजार लोकांना करोनाची लागण झाली असून ५७८ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती गंभीर असल्याने ब्रिटनमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रवास करणाऱ्याकडे पूर्ण तपशील मागितला जात आहे. याशिवाय रस्त्यांवर लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी एअरक्राफ्टचा वापर केला जात आहे.