जगभरातील देश करोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक देशांमध्ये तर युद्धाच्या वेळी जाहीर होते अशी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. भारतामध्येही २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली असून हा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. देशात करोनाग्रस्तांची संख्या एक हजारहून अधिक झाली आहे. देशातील नागरिकांमध्ये करोनाची भीती दिसून येत आहे. करोनाच्या संसर्गाचे भय इतके आहे की लोकं मृत व्यक्तीला खांदा देण्यासाठीही पुढे येत नाहीयत. बुलंदशहरमध्ये अशीच एक दुख:द पण सकारात्मक संदेश देणारी घटना घडली आहे.

बुलंदशहरमध्ये लॉकडाउनदरम्यान मृत्यू झालेल्या एका हिंदू व्यक्तीच्या अंतयात्रेला त्याचे नातेवाईक लॉकडाउनमुळे प्रवासाची सोय उपलब्ध नसल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळेच तेथील मुस्लीम बांधवांनी त्याच्या अंतयात्रेत प्रेताला खांदा दिला. इतकच नाही तर त्यांनी हिंदू पद्धतीने या व्यक्तीचे अंतिमसंस्कारही केले. सोशल मिडियावर या घटनेचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला जात आहे. या अंत्ययात्रेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये मुस्लीम युवक आपल्या खांद्यावर प्रेत घेऊन जाताना दिसत आहेत. तसेच हे तरुण हिंदू समाजात अंत्ययात्रा नेताना दिल्या जाणाऱ्या ‘राम नाम सत्य है’ असं म्हणताही दिसत आहेत.

मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव रविशंकर असून तो बुलंदशहर येथील आनंद विहार परिसरात राहत होता. रविशंकर यांना कॅन्सर होता. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा या आजारामुळे मृत्यू झाला. त्यांचे नातेवाईक, जवळचे मित्र आणि इतर ठिकाणी राहणाऱ्या ओळखीच्या लोकांना मृत्यूची बातमी कळवण्यात आली. मात्र लॉकडाउन असल्याने अनेकांना रविशंकर यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी येत आले नाही. त्यामुळे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारं जवळचं कोणीच बुलंदशहरमध्ये नव्हतं. रविशंकर राहत असलेल्या मुस्लीम समाजातील व्यक्तींना याबद्दलची माहिती मिळताच त्यांनी रविशंकर यांच्या घरी धाव घेत कुटुंबाचे सांत्वन केलं. इतकचं नाही तर या मुस्लीम बांधवांनीच रविशंकर यांच्या अंत्यविधीची सर्व तयारी केली. यामध्ये अगदी तिरडी बांधण्यापासून पार्थिव स्मशानभूमीपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी मुस्लीम बांधवांनीच पार पाडली. तरुणांबरोबर आजूबाजूच्या परिसरातील वयस्कर मुस्लीम नागरिकांनाही यामध्ये मदत केली.

रविशंकर यांचा मुलगा प्रमोद याने मुस्लीम समाजाने आम्हाला खूप सहकार्य केलं, एक समाज म्हणून ही सकारात्मक गोष्ट आहे असं मत व्यक्त केलं. रविशंकर यांच्या शेजारीच राहणाऱ्या जुबैर यांनी सर्वांनी एकत्र मिळून राहणं गरजेचं आहे. धर्माच्या आधारावर भेदभाव करणं चुकीचं आहे, असं मत व्यक्त केलं. स्माशानभूमीमध्ये बोलताना एका वयस्कर मुस्लीम व्यक्तीने मागील काही काळापासून हिंदू-मुस्लीम समाजाला हाताशी धरुन राजकारण करणारी काही वक्तव्ये समोर आली आहेत. मात्र आजचं हे दृष्य पाहिल्यावर भारतीय संस्कृतीमधील गंगा-जमुनेची शिकवण आजही कायम आहे. कठीण प्रसंगी हिंदू व्यक्तीच्या पार्थिवाला मुस्लीमांनी खांदा देणे हे त्यांच कर्तव्य आहे, आपण सर्व भारतीय आहोत आणि आपल्या आपल्यात भेदभाव करणं चुकीचं आहे, असं मनोगत या व्यक्तीने मांडलं.