सध्या करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. पुढील दोन दिवसांत म्हणजेच ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे. दरम्यान, याबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परंतु सध्या लॉकडाउनमुळे सर्व दुकानं बंद आहे. तसंच मद्यविक्रीचीही दुकानं बंद आहे. अशा परिस्थितीत काळ्या बाजारात मद्यविक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती अनेकदा समोर आहे आहे. राजस्थानमधील कोटा येथील आमदार भरतसिंह कुंदनकपूर यांनी या काळात मद्याची अवैध विक्री वाढल्याबाबत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना एक पत्र लहिलं आहे. यामध्ये त्यांनी एक अजब मागणीही केली आहे.

जर अल्कोहोलनं हात धुतल्यास करोनाचे विषाणू नष्ट होत असतील तर मद्याचं सेवन केल्यास घशातीलही करोनाचे विषाणू नष्ट होतील. त्यामुळे मद्यविक्रीची दुकानं सुरू करावीत अशी मागणी आमदार भरतसिंह कुंदनकपूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात मद्यविक्रीची अवैधरित्या होणारी विक्री वाढली आहे. तसंच ते पिणाऱ्यांना शारीरिक त्रासही सहन करावा लागत आहे. अवैध मद्यविक्रीमुळे राज्याच्या महसूलात घट होत आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी मद्यविक्रीची दुकानं सुरू करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

यापूर्वी महाराष्ट्रातही मद्यविक्रीची दुकानं सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भातील पत्र लिहिलं होतं. तसंच ही दुकानं बंद असल्यानं राज्याला मोठं नुकसान सोसावं लागत असून महसूलावरही त्याचा परिणाम झाल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं.