भारतात करोनाबाधितांची संख्या आता ३ लाखाच्या जवळ पोहोचली आहे. अशा परिस्थितीत कम्युनिटी ट्रान्समिशन नाकारणं हे व्यर्थ आहे, असं मत संसर्गजन्य रोग तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. गेल्या काही काळापासून केंद्र सरकारकडून करोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन होत असल्याचं नाकारण्यात येत होतं. तसंच सद्यपरिस्थितीत ही चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे. भारतात २४ मार्च रोजी लॉकडाउन लागू करण्यात आला होता. तेव्हा देशात करोनाबाधितांची संख्या कमी होती. परंतु दोन महिने लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतरही भारतातील करोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत २ लाख ७६ हजार ५८३ जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर यामुळे ७ हजार ७४५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

भारतात एप्रिल महिन्यापासूनच कम्युनिटी ट्रान्समिशनची परिस्थिती निर्माण झाली होती असं मत संसर्गजन्य रोगांच्या तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. लोकांना याची माहिती न दिली गेल्यानं लोकांमध्ये याबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. याव्यतिरिक्त सरकारला चाचण्यांची संख्याही त्या प्रमाणात वाढवता आली नाही. तसंच चाचण्यांची संख्या कमी असल्यानं सरकारला लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचं कारण मिळालं, असंही तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं. न्यूज १८ नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“देशात कम्युनिटी ट्रान्समिशन गेल्या काही काळापासून सुरू झालं आहे याची आपल्याला माहिती आहे. हे कोणत्याही परिस्थितीत कमी केलं जावं याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची प्रक्रिया कामी येणार नाही. आता प्रत्येक पायरीवर कॉन्टॅक्ट ट्रेस करणं शक्य नाही. आता कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरूवात झाली आहे हे सरकारनं स्वीकारायला हवं हे मी यापूर्वीही सांगितलं होतं. ते स्वीकारण्यात कोणतीही चूक नाही,” असं मत वेल्लोरच्या ख्रिस्तियन मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य जयप्रकाश मुलियिल यांनी सांगितलं.

स्वीकारल्यानं रणनीती बदलेल

“जर तुम्ही एखादा परिसर संपूर्णत: सील करत आहात, याचा अर्थ तुम्हाला त्याचं मूळ सापडत नाही. जे हॉटस्पॉटच्या बाहेर राहत आहेत ते लोकं कम्युनिटी ट्रान्समिशनची बाब नाकारल्यामुळे त्यांच्या चाचण्या करू शकत नाहीयेत. यामुळे याचा प्रसार अधिक होईल,” असं मत ‘नॅशनल हेल्थ सिस्टम रिसोर्स सेंटर’चे माजी अध्यक्ष डॉ. टी. सुंदररमन यांनी सांगितलं.

केंद्र सरकारद्वारे नाकारण्यात आलं असलं तरी आयएमसीआरच्या एका सर्वेक्षणात कम्युनिटी ट्रान्समिशनची परिस्थिती एप्रिल महिन्यापासूनच सुरू झाल्याचं दिसून आलं आहे. या सर्वेक्षणात असे अनेक रुग्ण सापडले होते ज्यांची कोणतीही पर्यटनाची पार्श्वभूमीही नव्हती. कम्युनिटी ट्रान्समिशनची बाब सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे जेणेकरून लोकं अधिक सावधगिरी बाळगतील, असं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलं.