देशात दिवसभरात ४६,९६३ बाधित, ४७० मृत्यू

नवी दिल्ली : देशातील करोनाची एकूण रुग्णसंख्या ८१.८४ लाखांवर पोहोचली आहे. मात्र सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येत ३० टक्के घट नोंदविण्यात आली आहे. ही आशादायी बाब मानली जाते.

देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ४६,९६३ रुग्ण आढळले तर ४७० रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण रुग्णसंख्या ८१,८४,०८२ वर पोहोचली असून, मृतांची संख्या १,२२,१११ झाली आहे. मृतांचे प्रमाण १.४९ टक्के आहे. देशभरात आतापर्यंत ७४,९१,५१३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण ९१.५४ टक्के आहे.

देशात ऑक्टोबरमध्ये करोनाचे १८,७१,४९८ रुग्ण आढळले. सप्टेंबरमध्ये ही संख्या २६,२१,४१८ होती. म्हणजेच ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये करोनाबळींमध्येही घट नोंदविण्यात आली आहे.

या महिन्यात २३,४३३ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबरमध्ये जवळपास रोज मृतांचा आकडा एक हजारपेक्षा अधिक होता. देशातील एकूण मृतांमध्ये हे प्रमाण १९.१९ टक्के आहे.

गेल्या सलग तीन दिवसांपासून उपचाराधीन रुग्णांची संख्या सहा लाखांखाली आहे. देशभरात ५,७०,४५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे प्रमाण ६.९७ टक्के आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

ठाणे जिल्ह्य़ात ६११ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात रविवारी ६११ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख १२ हजार १३३ इतकी झाली आहे. दिवसभरात १३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने करोनाबळींची संख्या ५ हजार ३५५ इतकी झाली आहे.

रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील १७६, नवी मुंबईतील १४५, कल्याण-डोंबिवली शहरातील १३०, मीरा-भाईंदरमधील ७३, ठाणे ग्रामीणमधील ३४, उल्हासनगर शहरातील २१, बदलापूर शहरातील १७, अंबरनाथ शहरातील १२ आणि भिवंडी शहरातील तीन रुग्णांचा समावेश आहे.

मृतांमध्ये नवी मुंबईतील चार, ठाणे शहरातील तीन, कल्याण-डोंबिवलीतील तीन, मीरा-भाईंदरमधील दोन आणि उल्हासनगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १७१ दिवसांवर

’ मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १७१ दिवसांवर गेला असून, रुग्णवाढीचा दर ०.४१ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे करोना प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे.

’ रविवारी शहरात ९०८ नव्या रुग्णांची नोंद झाली, असून २५ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात १,७१६ रुग्ण करोनामुक्त झाले. मृतांमध्ये ६० वर्षांवरील १९ रुग्ण, ४० ते ६० वयोगटातील पाच आणि ४० वर्षांखालील एका रुग्णाचा समावेश होता. यापैकी १७ जणांना दीर्घकालीन आजार होते.

’ मुंबईत ८९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले असून, १८०२६ जण उपचाराधीन आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी गेल्या आठवडय़ात १५७ दिवस होता. तो कमी झाला असून आता १७१ दिवसांवर गेला आहे. एकूण रुग्णसंख्या २,५८,४०८ वर पोहोचली असून, मृतांची संख्या १०,२७५ इतकी झाली आहे.

’ ३१ ऑक्टोबपर्यंत मुंबईत १५,३७,३५६ चाचण्या झाल्या असून, रुग्णवाढीचा दर ०.४४ टक्क्यांवरून ०.४१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.