भारत सरकारने बुधवारी इराणमधील २५५ भारतीयांना करोना लागण झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. याशिवाय आखाती देशांमधील १२, इटलीमधील आणि याशिवाय श्रीलंका, हाँगकाँग, कुवेत येथील प्रत्येकी एखा भारतीयाला करोनाची लागण झाली आहे. लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात केंद्र सरकारने माहिती दिली की, “परदेशात करोनाची लागण झालेल्या भारतीयांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी तेथील भारतीय दुतावास सतत त्यांच्या संपर्कात आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाची मदतही घेतली जात आहे”.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार ज्या भारतीयांना करोनाची लागण झालेली नाही त्यांना पुन्हा मायदेशी आणण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहे. याच पार्श्वभुमीवर इराणमध्ये अडकलेल्या १९५ भारतीयांची सुटका करत विशेष विमानाने त्यांना भारतात परत आणण्यात आलं. त्यांनी जैसलमेर येथे नेण्यात आलं होतं. याशिवाय मलेशियामध्ये अडकलेल्या ४०५ भारतीयांनाही पुन्हा मायदेशी परत आणण्यात आल. यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, “जर देशाबाहेर असणाऱ्या भारतीयांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर ज्याप्रमाणे आपण येथील परदेशी नागरिकांची काळजी घेत आहोत त्याप्रमाणे तेथील देशांनी त्यांची काळजी घेणं अपेक्षित आहे”.

करोनाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या देशांमध्ये इराणचा समावेश आहे. बुधवारपर्यंत इराणमध्ये ८५० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. केंद्र सरकारने इराणमधून बुधवारी ५८४ भारतीयांची सुटका करत त्यांना मायदेशी आणलं. यावेळी २६० भारतीयांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी तिथेच थांबवण्यात आलं आहे. भारतातून गेलेल्या डॉक्टरांनीच त्यांची तपासणी केली. “जर का तिथे काही झालं तर यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि इराणमधील भारतीय दुतावास जबाबदार असेल”, असं इराणमध्ये आपली आई अडकलेल्या तरुणाचं म्हणणं आहे.