तबलिगी जमातच्या सदस्यांनी आपल्या प्रवासाची माहिती उघड करावी असा आदेश छत्तीसगडमधील राजनंदगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तबलिगी जमातच्या सदस्यांनी १ मार्च २०२० पर्यंतच्या आपल्या प्रवासाची माहिती उघड करावी असा आदेशच जिल्हाधिकारी जे पी मौर्या यांनी दिला आहे. आपल्या आदेशात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की, जर संबंधित व्यक्तीने कोणतीही माहिती लपवली तर त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येईल.

“तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यांमधील अनेक जणांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे त्यांनी आपली १ मार्च २०२० पर्यंतच्या प्रवासाची माहिती उघड करावी अशी विनंती केली आहे. तसंच जर कोणीही छत्तीसगडमध्ये किंवा बाहेर प्रवास केला असेल तर त्याचीही माहिती द्यावी,” असं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटलं आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेश पत्रात सर्व धर्मियांना कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ नये असंही बजावलं आहे. धार्मिक स्थळावर जाण्याची परवानगी फक्त संबंधित पूजाऱ्याला असणार आहे. हा आदेश सर्व धर्मियांसाठी असून प्रत्येकाने त्याचं पालन करावं असं आदेशात सांगण्यात आलं आहे.

तबलिगी जमातचा कार्यक्रम करोना व्हायरसचा फैलाव करणारं हॉटस्पॉट ठरलं आहे. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा येथे काही जणांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी राज्यातील परिस्थिती नियंत्रणात असून चाचणींची संख्या वाढवत असल्याची माहिती दिली आहे.