माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकन कंपनी कॉग्निझंटने आपल्या कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यामध्ये २५ टक्के अधिक पगार देण्याची घोषणा केली आहे. करोनाच्या प्रादुर्भाव वाढल्यानंतरही ज्याप्रकारे कर्मचाऱ्यांनी कंपनीचे काम सुरु ठेवले आहे, त्यावर व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले आहे. याचा कामाचा मोबदला म्हणून हा अतिरिक्त पगार दिला जाणार आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. फिलिपिन्समध्येही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. जगभरातील सरकारे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि देशातील करोनारुग्णांचा आलेख वाढू नये यासाठी जे प्रयत्न करत आहेत. त्याला आमचा पाठिंबा आहे,” अशी माहिती कॉग्निझंटचे प्रमुख कार्यकारी अधिकारी असणाऱ्या ब्रायन हम्परिज यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये दिली आहे. “या साथ माहिती तंत्रज्ञान श्रेत्राबरोबर उद्योग श्रेत्राला नामउमेद करणारी आहे. त्यामुळे निश्चित केलेली ध्येय उद्दिष्ठ गाठण्यासाठी कसरत करावी लागणार आहे याचा आम्हाला अंदाज आहे,” असंही ब्रायन म्हणाले आहेत.

कपंनीने अनेक देशांमधील आपल्या कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची मुभा दिली आहे. “फिलिपिन्स आणि भारतामध्ये सेवा देणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर कामात राखलेले सातत्य कौतुकास्पद आहे. त्यामुळेच या देशांमधील सहाय्यक आणि त्या स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या (बेसिक सॅलरी) २५ टक्के अतिरिक्त रक्कम एप्रिल महिन्याच्या पगारामध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,” असंही ब्रायन यांनी या पत्रामध्ये नमूद केलं आहे. जगभरातील सर्वच कंपन्यांप्रमाणे कॉग्निझंटलाही करोनाचा फटका बसला आहे. लंडन, मुंबई, मिलान अशा प्रमुख शहरांमध्ये कंपनीच्या प्रोडक्टची मागणी आणि पुरवठा दोघांवरही परिणाम झाला असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

कंपनीच्या या निर्णयाचा फायदा कंपनीसाठी काम करणाऱ्या भारतामधील दोन-तृतीयांश कर्मचाऱ्यांना होणार आहे. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत देशातील १३ ठिकाणांवर कंपनीसाठी दोन लाख ३ हजार ७०० कर्मचारी काम करत होते. याचा फायदा भारतामधील एक लाख ३९ हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.

“सर्व तयारी आणि भविष्याचा विचार केल्यास, आमच्या आपत्ती व्यवस्थापन आणि उद्योग सातत्य राखण्यासाठी काम करणाऱ्या जगभरातील तज्ज्ञांनाही करोनामुळे बसणाऱ्या आर्थिक फटक्याचा अंदाज बांधणे कठीण आहे,” असं ब्रायन यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. कॉग्निझंट ही कंपनी मुख्यपणे कोअर बँकींग श्रेत्रामध्ये काम करते. बँकांचे सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यासाठी पुरवला जाणारा आयटी सपोर्ट कंपनीच्या मार्फत पुरवला जातो. तसेच आरोग्य विषय सेवा, आरोग्य व्यवस्थापन, विमा या श्रेत्रातही कंपनी काम करते.