भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी भाजपाचे नेते संबित पात्रा यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. पात्रा यांनी भारताच्या दोन माजी पंतप्रधानांची बदनामी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंदर्भातील वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीमध्ये पात्रा हे काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांबद्दल खोटी आणि अर्थहीन माहिती पसरवत असल्याचा आरोप युवा काँग्रसच्या नेत्याने केला आहे. पंतप्रधान जवहारलाल नेहरु आणि राजीव गांधी यांच्याबद्दल पात्रा यांनी खोटी माहिती पसरवल्याचे श्रीनिवास यांनी म्हटलं आहे.

श्रीनिवास यांनी केलेल्या तक्रारीमध्ये पात्रा यांना जाणून बुजून काँग्रेसचे नेते आणि भारताच्या माजी पंतप्रधानांची बदनामी करणारा मजकूर ट्विट केल्याचे म्हटले आहे. “जर करोना काँग्रेसच्या कार्यकाळात आला असता तर पाच हजार कोटींची मास्क घोटाळा, सात हजार कोटींचा टेस्टींग कीट घोटाळा, २० हजार कोटींचा जवाहर सॅनिटायझर घोटाळा आणि २६ हजार कोटींचा राजीव गांधी व्हायरस रिचर्स घोटाळा झाला असता,” असं ट्विट पात्रा यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी राजीव गांधी आणि नेहरु यांचे फोटोही वापरले आहेत.

पात्रा यांनी ट्विटवरुन केलेल्या ट्विटमध्ये एकही खरी गोष्ट नसल्याने कायद्याच्या दृष्टीने हे चुकीचे असल्याचे काँग्रसच्या नेत्याने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. “काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांची बदनामी करण्याच्या एकमेव हेतूने गुन्हेगाराने फोटो ट्विटवर पोस्ट केला आहे. लोकांसमोर पक्षाची वाईट प्रतिमा तयार व्हावी या हेतूने हा फोटो पोस्ट केलं आहे,” असं या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. अशा पोस्टमुळे एखाद्या व्यक्तीची जनतेमध्ये बदनामी होऊन त्यांची प्रतिमा मलिन होते असंही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळेच या प्रकरणात भारतीय कायद्यानुसार गुन्हेगाराविरोधात तक्रार दाखल करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो असंही श्रीनिवास यांनी म्हटलं आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या ट्विटला उत्तर देताना पात्रा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. “आज देशात काँग्रेस सरकार असतं तर चाचण्या, उपचार, व्यवस्था, मदतकार्य आणि तांत्रिक गोष्टींमध्ये भारत सर्वात पुढे असता,” असं ट्विट मध्य प्रदेश काँग्रेसने केलं होतं.