करोनाविरोधात लढा देण्यासाठी सरकारने आता नवा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. पाट टप्प्यांमध्ये या प्लॅनची अमलबजावणी केली जाणार आहे. केंद्र सरकारने शनिवारी या प्लॅनला मंजुरी दिली आहे.

देशातील लोकसंख्या बघता करोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. पण, देशात सर्वच ठिकाणी हा व्हायरस पसरेल असेही नाही. त्यामुळे या व्हायरसच्या फैलावर उपाय करण्यासाठी सरकार आता नवी नीती अवलंबत आहे. वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळे उपाय करण्याची सरकारची रणनीती आहे. जिथे करोनाचा सर्वाधिक फैलाव झाला आहे अशा हॉट स्पॉटच्या ठिकाणी कठोर प्रतिबंधात्मक उपाय केले जाणार जाण्याची शक्यता आहे.

सरकारने तयार केलेल्या स्ट्रॅटेजीनुसार पाच प्रकारच्या परिस्थितीनुसार काम करण्यात येणार आहे. भारतात प्रवासामुळे उद्भवलेल्या करोना लागण, स्थानिक पातळीवर किंवा कोणत्याही प्रवासाची हिस्ट्री नसताना झालेली लागण, मोठ्या प्रमाणात झालेली लागण पण त्यावर सहज मात करता येऊ शकेल अशी स्थिती, करोनाची समूह स्तरावर होऊ लागलेली लागण आणि त्यानंतर करोना महामाराची स्थिती अशा टप्प्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत.