नवी दिल्ली : देशभर विविध ठिकाणी ५४ हजार लोकांना सामूहिक देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांच्या आरोग्यासंदर्भात त्या-त्या विभागातील विलगीकरण कक्षांमधील वैद्यकीय कर्मचारी लक्ष ठेवून असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.

जगभरात करोना विषाणूंविरोधी लस निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याची अद्ययावत माहिती राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन केंद्रातील तज्ज्ञ घेत आहेत. तसेच, संशोधन प्रक्रिया होत असलेल्या संस्थांशी संपर्क ठेवून आहेत. अमेरिकेत नवी लस तयार करण्याचे काम केले जात असल्याचे ऐकले आहे. पण, लशीची चाचणी घेतल्याशिवाय त्याचा वापर करता येणार नाही. या चाचण्यांचे निष्कर्ष काय असतील, हेही पाहिले जात असल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले.

देशातील विविध रुग्णालयातील विलगीकरण कक्षांमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका तसेच, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे हर्षवर्धन यांनी कौतुक केले. विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही हर्षवर्धन यांच्या कौतुकाला पाठिंबा दिला. राज्यसभेतील खासदारांना आपापल्या राज्यातील विलगीकरण कक्षांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेण्याचे तसेच, या कक्षांची अवस्था काय आहे, त्यात कोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत याची शहानिशा करावी, असे आवाहन हर्षवर्धन यांनी केले. काही विलगीकरण कक्षांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याच्या तक्रारी असल्याची दखलही हर्षवर्धन यांनी घेतली. या तक्रारी अपवादात्मक आहेत पण, बहुतांश कक्षांमध्ये उत्तम उपचार पुरवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरन विलगीकरणात

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी स्वत:ला स्वविलगीकरणात ठेवले असून त्यांचा केरळात एका करोना संसर्गित रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरशी संपर्क आला होता. मुरलीधरन हे भाजपचे नेते असून ते दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी स्वविलगीकरण राहात आहेत. ते परराष्ट्र राज्यमंत्री आहेत. मूळचे केरळचे असल्याने ते रुग्णालयात पाहणीसाठी तेथे गेले होते. त्यांची चाचणी नकारात्मक आल्याचे समजते.

पहिल्या बळीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला संसर्ग

कलबुर्गी, बेंगळुरू : भारतात क रोनाने मरण पावलेल्या पहिल्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला करोना विषाणूचा संसर्ग झाला असून त्याची चाचणी सकारात्मक आली आहे. हा डॉक्टर ६३ वर्षे वयाचा असून त्याला त्याच्या घरी कुटुंबीयांसमवेत वेगळे ठेवण्यात आले होते. नंतर त्याला रुग्णालयातील विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे, अशी माहिती कलबुर्गीचे उप आयुक्त शरत बी यांनी दिली. वीस वर्षांची महिला ब्रिटनला गेली होती तिची चाचणी सकारात्मक आली असून त्यामुळे कर्नाटकातील एकूण रुग्णांची संख्या आता १० झाली आहे. कर्नाटकात आणखी दोन रुग्ण सापडले असून एकूण संख्या १० झाली आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री बी. श्रीरामुलु यांनी दिली आहे. या दहा रुग्णात कलबुर्गीत मरण पावलेल्या रुग्णाचा समावेश आहे. सोमवारी लंडनमार्गे अमेरिकेहून आलेल्या रुग्णाला विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून त्याला घरी ठेवण्यात आले होते नंतर रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. ८ मार्चला तो अमेरिकेतून लंडनमार्गे भारतात आला होता.