भारतात करोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या रुग्णावाढीमुळे आरोग्य व्यवस्थेवर अभुतपूर्व ताण आला आहे. त्यामुळे करोना संक्रमण रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सूचवल्या जात आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही केंद्राला काही सूचना केल्या आहेत. या सूचनांचा हवाला देत आणि इस्रायलने करोनावर मिळवलेल्या विजयाकडे बोट दाखवत शिवसेनेनं पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना चिमटे काढले आहेत. “पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने करोना लढ्याचे नेतृत्व करत होते ते पाहता इस्रायलच्या आधी आपला हिंदुस्थानच जगात करोनामुक्त होईल असं वातावरण अंधभक्तांनी निर्माण केलेच होते,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपा कार्यकर्त्यांसह समर्थकांचे कान टोचले आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेलं पत्र आणि इस्रायलने करोनामुक्त देश म्हणून केलेली घोषणा… या दोन मुद्द्यांवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे.”पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचार मोहिमेतून दिल्लीस परतले आहेत. दिल्लीत येताच दोघांनीही करोनासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष घालण्यास सुरुवात केली. पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलावून करोनाच्या गांभीर्याबाबत चर्चा केली, तर शहा यांनी स्पष्ट केले की, घाईघाईने लॉकडाउन लावण्याची गरज नाही. मोदी यांना एव्हाना एक आनंदाची बातमी समजली असेलच. इस्रायल या देशाने करोनावर मात केली आहे. करोनामुक्तीची घोषणा करणारा इस्रायल हा जगातील पहिला देश ठरला आहे. पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने करोना लढ्याचे नेतृत्व करत होते ते पाहता इस्रायलच्या आधी आपला हिंदुस्थानच जगात करोनामुक्त होईल असं वातावरण अंधभक्तांनी निर्माण केलेच होते. पण करोनामुक्ती सोडाच, देशात करोनानं घातलेलं थैमान हाताबाहेर गेलं. इस्रायलने देश करोनामुक्त होण्यासाठी काय केले? त्यांनी संपूर्ण लसीकरण तर केलेच, पण नियम आणि निर्बंधांचे काटेकोर पालन केले. फालतू राजकारण, थाळ्या किंवा टाळ्या पिटून करोना पळवणे या नवटांक उद्योगांना थारा दिला नाही. आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी यांना पत्र लिहून जी पंचसूत्री काल मांडली तेच धोरण इस्रायलने राबवले. मनमोहन हे शांतपणे काम करणारे नेते आहेत. पंतप्रधान मोदी यांनाही मनमोहन सिंग यांनी काही सूचना केल्या आहेत. करोनावर मात करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, पण लोकांचे लसीकरण होणे सर्वात महत्त्वाचे आहे. पुढील सहा महिन्यांत राज्यांना कशा पद्धतीने लसपुरवठा होईल याबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावे, असे मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना सुचवले आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

मनमोहन काय सांगतात? कोणत्या राज्याला किती लसी मिळाल्यात याबाबत एक पारदर्शक सूत्र असायला हवं. करोना काळात सरकार किती लसी कंपन्यांकडून घेत आहे ते सार्वजनिक करावे. कोणत्या कंपनीकडून किती लसी घेण्यात आल्या, कोणत्या कंपनीला किती लसींची ऑर्डर दिली हे लोकांना समजायलाच हवं. मनमोहन यांनी एक महत्त्वाची सूचना केली आहे ती म्हणजे करोना लसनिर्मितीसाठी लागणारा परवाना काही काळासाठी स्थगित करावा, जेणेकरून अन्य कंपन्याही लसीची निर्मिती करू शकतील. कंपन्यांना उत्पादनासाठी मदत व्हावी यासाठी पंतप्रधानांनी फंड, तसेच इतर सवलती द्याव्यात. केंद्र सरकार आपत्कालीन गरजांसाठी १० टक्के लसी ठेवू शकते, पण राज्यांना संभाव्य लसीबाबत स्पष्ट संकेत मिळायलाच हवेत. जेणेकरून राज्ये आपली योजना तयार करू शकतील. यातील बऱ्याच गोष्टी इस्रायलसारख्या देशाने अंमलात आणल्या व त्यामुळे तो देश पूर्णपणे करोनामुक्त झाला. पंतप्रधान मोदी यांचे मधल्या काळात इस्रायलमध्ये फार कौतुक झाले. याचा आपल्यालाही अभिमान वाटायलाच हवा. पण इस्रायलला जे जमले ते मोदींना आपल्या देशात का जमवता आले नाही? करोनास पळवण्यासाठी व तेथील पांढऱ्या कपड्यातील देवदूतांना बळ देण्यासाठी इस्रायलच्या राज्यकर्त्यांनी थाळ्या वाजवण्याचे फालतू उपक्रम साजरे केले नाहीत. जे ‘प्रॅक्टिकल’ आहे तेच केलं. इस्रायल लोकसंख्येच्या तुलनेत लहान देश आहे. पण या संकटकाळात तेथे विरोधकांच्या सल्ल्यांनाही महत्त्व देण्यात आले. इस्रायलमध्ये कोणताही उत्सव साजरा न करता सार्वजनिक लसीकरण केले. त्याचा परिणाम असा झाला की, इस्रायलने आता सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा उघडल्या आहेत,” असं म्हणत शिवसेनेनं पंतप्रधान मोदींना चिमटा काढला आहे.

काही जमतंय का बघा!

“परदेशी पर्यटकांवरील बंदी हटवण्यात आली असून पर्याटकांचेही लसीकरण करण्यात येईल असे जाहीर केले आहे. सार्वजनिक ठिकाणी ‘मास्क’ वापरण्याचे निर्बंध हटवण्यात आले असून मोठ्या सभा व संमेलनांत मात्र ‘मास्क’ वापरणे बंधनकारक असल्याची नियमावली जाहीर केली आहे. इस्रायल लहान देश असला तरी तेथेही करोनाने ६७०० बळी आतापर्यंत घेतले. १० लाखांवर जनता त्या काळात करोनाने संक्रमित झाली. त्यामुळे करोनाच्या वणव्याचे चटके इस्रायलनेही सहन केले, पण आता इस्रायल करोनामुक्त झाला व तशी अधिकृत घोषणाच करण्यात आली. मोदी व इस्रायलच्या राज्यकर्त्यांत मधुर संबंध मधल्या काळात प्रस्थापित झाले. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे तर मोदींना जवळचे मित्रच मानतात व नेतान्याहू यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात मोदी यांच्या होर्डिंग्जचा मोठ्या प्रमाणात वापर केला. मोदी नावाचा वापर करून नेतान्याहू यांनी त्यांच्या देशातील करोना पळवून लावला असंही भक्त मंडळ बोलू शकते. अशा प्रचारपंडितांना कोणी रोखायचे? ते तर सुरूच राहणार. म्हणून मनमोहन यांची पंचसूत्री दुर्लक्षून चालणार नाही. मनमोहन यांचे मार्गदर्शन राष्ट्रहितासाठीच आहे. त्यास राहुल गांधींनीही हातभार लावला आहे. वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी प. बंगालमधील सर्व सभा रद्द केल्या हासुद्धा करोना नियंत्रित करण्याचा धाडसी उपाय आहे. इस्रायलने गेले वर्षभर हाच मार्ग अवलंबला. बहुधा मनमोहन सिंग यांची ‘मन की बात’ बेंजामिन नेतान्याहूपर्यंत पोहोचली असेल. आता ती मनमोहन यांनी पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंतही पोहोचवली आहे. त्याप्रमाणे काही जमतंय का बघा!,” असं म्हणत शिवसेनेनं पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.