गुजरातमध्ये एकीकडे करोना रुग्णसंख्या वाढत असतानाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूरत जिल्ह्यामध्ये चक्क कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून रुग्णालयात व्हेंटिलेटर नेण्यात आले. व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याने ३४ व्हेंटिलेटर ट्रकमधून नेण्यात आले होते. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

गुजरातमध्ये सोमवारी पहिल्यांदाच दिवसाला तीन हजारांहून जास्त करोना रुग्णांची नोंद झाली. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे राज्यात व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयांमध्ये तुटवडा भासू लागल्याने गुजरात सरकारने वलसाड येथून सुरतला ३४ व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्याचा आदेश दिला होता. राज्य सरकारच्या आदेशानंतर सूरत महापालिकेने व्हेंटिलेटर आणण्यासाठी वलसाडला कचऱ्याची वाहतूक करणारा ट्रक पाठवला होता.

आणखी वाचा- आठवड्याचा लॉकडाउन परिणामकारक नाही; केंद्राने महाराष्ट्राला दिला होता सल्ला

वलसाडचे जिल्हाधिकारी आर आर रावल यांनी सूरत महापालिकेने पाठवलेल्या वाहनातून व्हेंटिलेटरची वाहतूक झाल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

गुजरातमध्ये सोमवारी एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली. सोमवारी २४ तासांत पहिल्यांदाच तीन हजार रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडत ३१६० रुग्णांची नोंद झाली. यासोबत गुजरातमधील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ३ लाख २१ हजार ५९८ झाली आहे. तर एकूण ४५८१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १६ हजार २५२ इतकी आहे.