फ्रान्समध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १९ हजारांजवळ पोहोचली आहे. बळींची संख्या १९ हजारांच्या जवळ पोहोचल्याने एकीकडे चिंता असताना दिलासा देणारी बाब म्हणजे डेटा हाती आला आहे त्यानुसार करोनाचा फैलाव होण्याचा वेग मंदावत आहे. एक महिन्याच्या लॉकडाउननंतर करोनाचा वेग मंदावला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. फ्रान्समध्ये करोनामुळे मृत झालेल्यांची संख्या १८ हजार ६८१ झाली आहे.

फ्रान्समधील आरोग्य विभागाचे प्रमुख जेरोम यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, रुग्णलयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी कमी झाली आहे. तर आयसीयूत दाखल होणाऱ्या संख्येत सलग नवव्या दिवशी घट झाली आहे. “आम्ही केलेल्या एकत्रित प्रयत्नांना यश मिळत आहे. लॉकडाउनचं फळ आम्हाला मिळत आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सध्या फ्रान्समध्ये आयसीयूत ६०२७ रुग्ण आहेत. १ एप्रिलपासूनचा हा आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा आहे. करोनाचा फैलाव होण्याआधीच फ्रान्सने पूर्ण तयारी करत पाच हजार बेड तयार ठेवले होते. सोबतच व्हेंटिलेशनल गेअरचीही व्यवस्था करण्यात आली होती.

करोनाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये फ्रान्सचा समावेश आहे. अमेरिका, इटली आणि स्पेननंतर सर्वात जास्त मृत्यू फ्रान्समध्ये झाले आहेत. यानंतर ब्रिटनचा क्रमांक आहे. या पाच देशांमध्ये मिळून एकूण १ लाख ४९ हजार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.