बीजिंग : चीनमध्ये करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या २१३ झाली असून संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ही ९६९२ झाली आहे. हुबेई प्रांतात ४३ जण नव्याने मरण पावले आहेत.

हुबेई प्रांतातच रुग्णांची संख्या अधिक असून १९८२ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ९६९२ झाली आहे. भारत, ब्रिटन, अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान व फ्रान्स यांसह एकूण वीस देशांत करोना विषाणूचे रुग्ण सापडले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूने निर्माण झालेल्या परिस्थितीवर आरोग्य आणीबाणी जाहीर केली असून त्यावर चीनच्या परराष्ट्र प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चीन सरकारने याबाबत सर्वंकष प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत. यातील अनेक उपाय हे आंतरराष्ट्रीय आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांच्या पलीकडे जाऊन केलेले आहेत. करोना विषाणूविरोधातील लढाई आम्ही जिंकू अशी आशा आहे. चीनने विषाणूचा जनुकीय आराखडा उलगडला असून तो प्रसारित केला आहे त्याबाबत चीनने पारदर्शकता बाळगली आहे.

वुहानमधील भारतीयांना आणण्यासाठी विमान

नवी दिल्ली : चीनमधील करोना विषाणूग्रस्त वुहान शहरात येथे अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे ४२३ आसनांचे खास विमान दिल्ली विमानतळावरून शुक्रवारी दुपारी १.२० वाजता रवाना झाले आहे.

केरळमध्ये १०५३ संशयित रुग्ण देखरेखीखाली

कोची : चीनमधील वुहान येथून केरळात परतलेल्या एका विद्यार्थ्यांस नवीन करोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता केरळमध्ये एकूण १०५३ लोकांना विषाणूचा संसर्ग असल्याच्या संशयावरून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांला लागण झाली आहे त्याला त्रिचूर येथील रुग्णालयात हलवले आहे.