दिल्लीमधील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतान दिसत आहे. शुक्रवारी दिल्लीमध्ये करोनाचे ६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिल्लीमधील करोनाग्रस्तांची संख्या शुक्रवारीच एक हजार ७०० हून अधिक झाली होती. तर करोनामुळे मरण पावलेल्याची संख्या (शुक्रवारपर्यंत) ४२ इतकी झाली आहे. दिल्लीमधील कोरनाचा वाढता धोका पाहता येथील नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मास्क न घालता घराबाहेर पडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. अशाच दोन पोलिसांमध्येच मास्क घालण्यावरुन हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आलं आहे.

दिल्लीतील प्रेम नगर येथील एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हवालदाराने मास्क न घातल्याबद्दल आक्षेप व्यक्त केला. यावरुन अधिकारी आणि हवालदार यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर या अधिकाऱ्याने दांडक्याने आपल्याला मारहारण केल्याचा आरोप हवालदाराने केला असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

आणखी वाचा- लॉकडाउनदरम्यान दिल्लीकरांना पाण्यासाठी लावाव्या लागत आहेत लांबच लांब रांगा

दोन पोलिसांमध्ये मास्क घालण्यावरुन वाद झाल्याचे वृत्त खरं असल्याची माहिती रोहिणी विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त एस. डी. मिश्रा यांनी दिली आहे. प्रेमनगर पोलीस स्थानकातील स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) आणि दुर्गा चौक येथील पोलीस हवालदारामध्ये मास्क घालण्यावरुन वाद झाला. हा प्रकार सोमवारी रात्री घडला आहे, अशी माहिती मिश्रा यांनी दिली आहे. ही घटना घडल्यानंतर काही दिवसांनी यासंदर्भातील माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा- ‘जामीन हवा असेल तर PM Cares Fund साठी ३५ हजार द्या, आरोग्य सेतू डाउनलोड करा’; न्यायालयाचे आदेश

या प्रकरणासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस खात्याला दिले आहेत. या प्रकरणात दोषी अढळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल अशी माहितीही देण्यात आली आहे.