दिल्लीच्या निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद यांनी जेव्हा दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत बंगलेवाली मशीद रिकामी करण्यास नकार दिला तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना तात्काळ तिथे पोहोचून तोडगा काढण्यास सांगितलं. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितानुसार, अजित डोवाल २८-२९ मार्च रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मर्कझमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी मौलाना साद यांची मनधरणी करत मशिदीमधील सर्वांची करोना चाचणी करण्यासाठी आणि क्वारंटाइन करण्यासाठी तयार केलं.

सुरक्षा यंत्रणांना तेलंगणमधील करिमनगर येथील आठ जण करोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर अमित शाह आणि अजित डोवाल यांना निजामुद्दीन येथील परिस्थितीची कल्पना आली होती. सुरक्षा यंत्रणांनी यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्व राज्यांच्या पोलिसांना यासंबंधी अलर्ट पाठवला होता.

आणखी वाचा- तबलिगी मर्कझ: मोदी सरकारमधील नेते मुख्तार अब्बास नकवी म्हणतात, ” हा तर तालिबानी गुन्हा, यांना…”

अजित डोवाल यांनी मध्यस्थी केल्यानंतर मर्कझकडून १६७ तबलिगी कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली. अजित डोवाल यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक देश आणि विदेशातील अनेक मुस्लीम संघटनांशी चांगले संबंध निर्माण केले आहेत. देशाचं धोरण ठरवताना अनेकदा अजित डोवाल या संघटनांशी चर्चाही करतात.

आणखी वाचा- Coronavirus : निझामुद्दीन येथील कार्यक्रमातून बडोद्यात परतलेले पाच जण होम क्वारंटाइन

दरम्यान सध्या दिल्लीमधील हे ऑपरेशन दुसऱ्या टप्प्यात दाखल झालं आहे. सुरक्षा अधिकारी सध्या मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांची माहिती घेत असून त्यांची वैद्यकीय चाचणी होईल याची काळजी घेत आहेत.या कार्यक्रमात एकूण २१६ परदेशी नागरिक उपस्थित होते. इतकंच नाही तर देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील एकूण ८०० नागरिक उपस्थित होते. यामधील अनेक नागरिक इंडोनेशिया, मलेशिया आणि बांगलादेशमधील आहेत. परदेशी नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं का याचीही पाहणी केली जात आहे. पण सुरक्षा यंत्रणांसमोर कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची माहिती मिळवून त्यांची करोना चाचणी करण्याचं सर्वात मोठं आव्हान आहे.