चीनमधील वुहान व हुबई प्रांतांत सुरू झालेले करोना साथीचे थैमान आता जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये पसरले आहे. मात्र ७६ दिवसांनंतर बुधावारी पहिल्यांदाच वुहानमधील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. येथे करोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अगदी शून्यावर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे वुहानमधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. येथे राहणाऱ्या भारतीयांनाही लॉकडाउनचे निर्बंध हटवण्यात आल्यानंतरसुटकेचा निश्वास सोडला आहे. निर्बंध उठवण्यात आल्यानंतर काही जणांनी आपल्या मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी दुसरीकडे भारतातील केरळ राज्यामधील अनीला पी अजयन या मुलीने परत न येता तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. “माझ्या माध्यमातून हा विषाणू भारतात येऊ नये असं मला वाटतं, म्हणूनच मी भारतात परत न येण्याचा निर्णय घेतला आहे,” असं येथील चायनीज अकॅडमी ऑफ सायन्समधील हायड्रोबायलोजी इन्स्टिट्यूटमध्ये (आयबीएच) डॉक्टरेटचं शिक्षण घेणाऱ्या अनीला हिने ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं.

सध्या येथील निर्बंध उठवण्यात आल्याने येथे एकप्रकारे आनंद साजरा केला जात आहे. “येथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सध्या आनंद दिसत आहे. मात्र प्रत्येकजण सतर्क आहे,” असं अनीला सांगते. अनीलाही मूळची केरळमधील पठाणमथिट्टा येथील इलावुमथिट्टा येथील आहे.  “मागील तीन महिन्यापासून मला वुहानमध्ये केवळ रुग्णवाहिकांच्या सायरन आणि चीनी भाषेतील रेडीओ मेसेजेसचाच आवाज ऐकू येत होता. मी येथे भेटलेले अनेक लोकं मला निराश दिसत होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आता सर्वजण आनंदी आहेत. सर्वजण जरा शांत झाले आहे. रस्त्यांवर पुन्हा लोकं दिसू लागली आहेत. आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थीही परत येऊ लागलेत,” असं अनीलाने आपले अनुभव कथन करताना सांगितलं.

वुहानमधील निर्बंध उठवण्यात आले असले तरी येथील लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात औषध फवारणी केली जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यासाठी नागरिकांना ग्रीन हेल्थ कोड देण्यात आला आहे. हा कोड असणाऱ्यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करता येणार आहे. मॉल्स आणि शॉपिंग सेंटरमध्ये थर्मल स्कॅनर लावण्यात आले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान ३७.२ अंश सेल्सीअसपेक्षा अधिक असल्यास अशा व्यक्तींना प्रवेश नाकारला जात आहे. सर्वच दुकांनांमध्ये सकाळच्या वेळी फक्त वयस्कर लोकांना प्रवेश दिला जात आहे.

करोनाचा संसर्ग होण्यास डिसेंबर महिन्यापासून वुहानमधूनच सुरुवात झाली होती. करोनामुळे शहरात ३३०० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ८२ हजाराहून जास्त लोकांना करोनचा लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. नुकत्याच समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या काही आठवड्यात करोनाच्या केसेसमध्ये घसरण पहायला मिळाली आहे. मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, शहरात करोनाचा एकही रुग्ण मिळालेला नाही. ७६ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये लोकांच्या घराबाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली होती. फक्त जीवनाश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची लोकांना परवानगी होती. शहराच्या सीमाही बंद करण्यात आल्या होत्या.