देशामधील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले शेतमाल ग्राहकांपर्यंत नेण्यात अडचणी येत आहेत. यामधून निराश झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने तीन हजार किलो (तीन टन) टोमॅटो तलावात फेकून दिल्याची घटना कर्नाटकमधील मांड्या जिल्ह्यामध्ये घडली आहे.

मांड्यामधील पांडवपुरा येथील इंगालाकुप्पी येथील एका तरुण शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने टोमॅटोचे उत्पादन घेतलं होतं. या तरुण शेतकऱ्याने आपल्या मिनी व्हॅनमधून हे टोमॅटो मैसूरच्या बाजारामध्ये विक्रीसाठी नेण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांना त्याला वाटेतच आडवलं. आपल्या गाडीमध्ये शेतमाल आहे तो खराब होईल, शेतमालाच्या वाहतूकीस बंदी नाही असा युक्तीवाद या शेतकऱ्याने केला. मात्र पोलिसांनी त्याचं काहीही ऐकून घेतलं नाही. त्यामुळे त्याला टोमॅटोने भरलेली गाडी पुन्हा आपल्या गावात आणावी लागली. एवढं उत्पादन घेऊनही केवळ लॉकडाउन आणि पोलिसांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ते विक्रीसाठी बाजारात नेता येत नसल्याने हा तरुण शेतकरी संतापला. रागाच्या भरातच त्याने टोमॅटोने भरलेला ट्रक गावातील तळ्याच्या किनारी नेला आणि तिथेच त्याने तीन टन टोमॅटो ओतून दिली.

टीव्ही ९ कानडा या वृत्तवाहिनीने या प्रसंगाचे व्हिडिओ प्रक्षेपित केले आहेत. या व्हिडिओमध्ये तरुण शेतकरी रागाच्या भरात टोमॅटोचे कॅरेटच्या कॅरेट तळ्यामध्ये ओतताना दिसत आहे. अधिकाऱ्यांनी आपल्याला योग्य वागणूक दिली नाही आसा आरोपही या शेतकऱ्याने केला आहे. तसेच दोन दिवसांपासून आपण हा शेतमाल जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन विकण्याचा प्रयत्न करत असल्याचेही या तरुणाने म्हटलं आहे. शेतमाल खराब होईल हा आपला दावाही अधिकाऱ्यांनी मान्य केला नाही याबद्दल या तरुणाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात टोमॅटोची साठवण करण्यासाठी जागा नसल्याने तो ओतून देण्याशिवाय आपल्याकडे काहीही पर्याय शिल्लक नसल्याने आपण हे टोमॅटो तळ्यात फेकून दिल्याचे या तरुणाने म्हटलं आहे. राज्यामध्ये शेतकऱ्यांची कशी अडवणूक होत आहे हे दाखवण्यासाठी सर्व घटनाक्रम या तरुणाने रेकॉर्ड केला असून तो येथील खासदाराला तसेच आमदारांना पाठवणार असल्याचेही त्याने स्पष्ट केलं आहे.

केवळ दक्षिणेतच नाही तर त्रिपुरामधील आगरतळा येथील शेतकऱ्यांनाही लॉकडाउनचा फटका बसला आहे. येथील गोलाबस्ती परिसरामध्ये अनेक दूध उत्पादक शेतकरी राहतात. मात्र लॉकडाउननंतर दूधाला पुरेसा भाव राहिला नाही आणि त्याचे वितरण करणंही शक्य नसल्याने तसेच साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांना दूध ओतून द्यावे लागले आहे. येथील ४०० शेतकरी कुटुंब राहतात ज्यांच्यासाठी दुग्दव्यवसाय हा जोडधंदा आहे. लॉकडाउनमुळे हा जोडधंदाच बंद पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

एकीकडे शहरांमधून आपआपल्या राज्यामध्ये निघालेल्या लोकांकडे खाण्यासाठी अन्न नासल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे आणि आडमुठ्या भूमिकेमुळे घेतलेल्या उत्पादनातील शेतमाल फेकून द्यावा लागत आहे. यामधून व्यवस्थापनातील त्रूटी आणि समन्वयाचा आभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.