देशात करोनानं शिरकाव करून आता काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सुरूवातीच्या काळात करोना रुग्ण आढळून आल्यानंतर प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं कडक लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. तब्बल दोन अडीच महिने देश प्रसार रोखण्यासाठी बंदिस्त अवस्थेत होता. त्यानंतर हळूहळू लॉकडाउन शिथिल केला जात आहे. तर दुसरीकडे नियंत्रणात असलेली रुग्णसंख्याही प्रचंड वेगानं वाढत चालली आहे. मागील काही आठवड्यांपासून देशात दिवसाला ५५ ते ६५ हजारांपर्यंत रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णवाढीचा कालावधीही कमी होताना आहे. यात महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचा वाटाही मोठा आहे.

देशातील करोनाची रुग्णसंख्या सातत्यानं वाढत आहे. करोना चाचण्यांमध्येही वाढ झाली असून, मागील तीन दिवसात देशात २५ लाखांपेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत. आयसीएमआरच्या माहितीप्रमाणे बुधवार आणि गुरूवारच्या दरम्यान देशात साडेआठ लाख चाचण्या झाल्या. इतक्या मोठ्या संख्येनं देशात पहिल्यादाच चाचण्या झाल्या आहेत. शुक्रवारपर्यंत ८.४८ लाख तर शनिवारपर्यंत देशात ८.६८ लाख चाचण्या झाल्या आहेत. देशात आतापर्यंत २ कोटी ८५ लाख चाचण्या झाल्या आहेत.

चाचण्याच्या वाढलेल्या वेगामुळे देशातील रुग्णसंख्याही झपाट्यानं वाढत आहेत. देशात गेल्या २४ तासात ६५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. मागील काही दिवसांपासून ५० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असल्यानं भारतातील रुग्णसंख्येत ८ दिवसात ५ लाखांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या २५ लाख २६ हजार १९३ वर पोहचली आहे. करोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येत भारत जगात आता चौथ्या स्थानी असून, देशात ४९ हजार ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. करोनामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. राज्यातील रुग्णसंख्या ५ लाख ७२ हजारांच्या पलिकडे गेली आहे. तर मागील २४ तासात राज्यात ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या १९ हजार ४२७ इतकी झाली आहे. देशातील एकूण मृत्यूपैकी एक तृतीयांशापेक्षा जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रानंतर करोनाचा फटका बसलेल्या राज्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आहे.