देशावर ओढवलेल्या करोना संकटानं प्रचंड मोठा आर्थिक फटका बसल्याची माहिती हळूहळू समोर येत आहे. अनेक क्षेत्रांना करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका बसला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याचा स्टार्टअप वरती मोठा परिणाम झाला आहे. देशातील १२ टक्के स्टार्टअप बंद पडले असून, तब्बल ७० टक्के स्टार्टअपची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या गंभीर झाली आहे.

इंडस्ट्री चेंबर फिक्की व इंडियन एंजेल नेटवर्क यांनी ‘भारतीय स्टार्टअपवर झालेला करोनाचा प्रभाव’ या विषयावर एक पाहणी केली. या पाहणीच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अहवालानुसार ३३ टक्के स्टार्टअपने आपली गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तर १० टक्के स्टार्टअपचे करार संपुष्टात आले आहेत. केवळ २२ टक्के स्टार्टअपकडेच पुढील तीन ते सहा महिने निर्धारित खर्चासाठी निधी उपलब्ध आहे. तर ६८ टक्के स्टार्टअपनं खर्चाला कात्री लावण्यास सुरूवात केली आहे.

…तर कर्मचारी व पगार कपात करावी लागणार

या पाहणीमध्ये ३० टक्के कंपन्यांनी असं म्हटलं आहे की, लॉकडाउन आणखी दीर्घ काळ वाढवण्यात आला. तर कर्मचारी कपातीचा निर्णय घ्यावा लागू शकतो. दुसरीकडे ४३ टक्के स्टार्टअपनं एप्रिल ते जून दरम्यान २० ते ४० टक्के पगार कपात करण्यास सुरूवात केली आहे. या पाहणी अहवालामध्ये स्टार्टअप सेक्टरसाठी तातडीनं आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. ९६ टक्के गुंतवणुकदारांनी असं म्हटलं आहे की, त्यांच्या गुंतवणुकीवर करोनाचा परिणाम झाला आहे. तर ९२ गुंतवणुकदारांनी पुढील तीन ते सहा महिने स्टार्टअपमध्ये कमी गुंतवणूक करणार असल्याचं म्हटलं आहे.

फिक्कीचे महासचिव दिलीप चिनॉय याविषयी बोलताना म्हणाले,”सध्या स्टार्टअप सेक्टर तग धरून राहण्याचा प्रयत्न करत आहे. गुंतवणूक मंदावली आहे आणि पुढील महिन्यातही अशीच राहण्याची शक्यता आहे. खेळते भांडवल व निधीअभावी स्टार्टअप पुढील ३ ते ६ महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करू शकतात,” असं चिनॉय म्हणाले.