News Flash

मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग; विजयी मिरवणुकांवर बंदी

२ मे रोजी पाचही राज्यांचा निकाल जाहीर होणार आहे

संग्रहित (PTI)

देशात एकीकडे करोनाचा कहर सुरु असताना दुसरीकडे पाच राज्यांमधील निवडणूकदेखील चर्चेचा विषय ठरत आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाही या राज्यांमध्ये सुरु असलेल्या प्रचारसभा आणि गर्दी यामुळे नाराजी जाहीर होत आहे. त्यातच मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तुम्हीच जबाबदार आहात अशा शब्दांत फटकारलं आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला असून २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष करता येणार नाही.

करोनालाट निवडणूक आयोगामुळेच!

मद्रास उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर निवडणूक आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने मतमोजणीच्या दिवशी करोनाच्या नियमांचं पालन कशा पद्धतीने केलं जाईल यासंबंधी ब्ल्यू प्रिंट सादर करण्यास निवडणूक आयोगाला सांगितलं होतं. पाचही राज्यांमध्ये प्रचारसभांदरम्यान करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन होत असतानाही राजकीय पक्षांना न रोखल्याने मद्रास उच्च न्यायालयाने नाराजी जाहीर केली होती.

करोना फैलावास केवळ आयोगच जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, अशा शब्दांत न्यायालयाने आयोगाला फटकारलं होतं. येत्या २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान करोना नियमांच्या पालनाचे निर्देश देण्याच्या मागणीसाठी तमिळनाडूचे परिवहनमंत्री आणि अण्णाद्रमुकचे उमेदवार एम. आर. विजयभास्कर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्या. एस. राममूर्ती यांच्या खंडपीठाने सोमवारी सुनावणी घेतली. करोना नियमांचे पालन करून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत, असे निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयात सांगताच न्यायालयाने आयोगाची कानउघाडणी केली.

राजकीय पक्षांना मोठ्या प्रचारसभा आयोजित करण्याची परवानगी देऊन निवडणूक आयोगाने करोनाच्या दुसऱ्या लाटेला मार्ग मोकळा करून दिला. करोनाच्या दुसऱ्या लाटेला आयोगालाच जबाबदार धरलं पाहिजे, असं मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी नमूद केलं. निवडणूक आयोग ही सर्वाधिक बेजबाबदार संस्था आहे, अशी टिप्पणी करत न्यायालयाने २ मे रोजीची मतमोजणी थांबवण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा आयोगाला दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 11:13 am

Web Title: coronavirus election commission bans victory processions during and after counting of votes on may 2 sgy 87
Next Stories
1 Coronavirus: “बालाजीची प्रार्थना करा, देवाला नारळ चढवा”; केंद्रीय मंत्र्याचा रुग्णांच्या नातेवाईकांना अजब सल्ला
2 भारताला दिलासा; २४ तासांत अडीच लाखांहून अधिक रुग्ण उपचारातून बरे
3 Video : …अन् स्ट्रेचरची वाट न पाहता डॉक्टरांनेच गरोदर महिलेला उचलून आपत्कालीन विभागात नेलं
Just Now!
X