करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. तसंच अनेक उद्योगधंदेही बंद आहेत. त्यामुळे येत्या काळात अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक व्यवसायांवरही याचा परिणाम दिसून येत आहे. या महामारीमुळे होणाऱ्या नुकसानीची गणना करणे कठीण आहे. आपण अद्यापही या संकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. दरम्यान, करोनामुळे विविध संस्था कशा प्रकारे प्रभावित होत आहेत हे आपण पाहू शकतो. या संपूर्ण स्थितीचा परिणाम यावर्षी कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या अप्रेजलवरही पडू शकतो.

लॉकडाउनचा सर्वाधिक परिणाम विमान कंपन्या, पर्यटन, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांवर झाला आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रालाही करोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या संकटाचा परिणाम या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि मिळणाऱ्या बोनसवरही पडणार आहे.
करोनाव्यतिरिक्त आर्थिक मंदीची झळ सोसणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळेही या वर्षी वेतनवाढीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०२० मध्ये भारतीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी ९.१ टक्क्याची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ‘एऑन’नं केलेल्या सर्वेक्षणानुसार ही वाढ या दशकातील सर्वात कमी वाढ मानली जात होती. परंतु जागतिक अर्थव्यवस्थेला करोनाचा फटका बसल्यानंतर याचा परिणाम अधिक जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वेतनवाढही उशिरा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही कंपन्यांकडून सद्यस्थितीचं आकलन सुरू आहे. कामगिरीच्या मूल्यांकनाचा निर्णय, पगाराच्या वाढीवर होणारा परिणाम, कंपनीतील कर्मचार्‍यांना कायम राखून ठेवणे आणि कर्मचार्‍यांचे एकूणच मनोबल याबाबत काय निर्णय घ्यावा या प्रश्नानं सर्वच कंपन्यांना द्विधा मनस्थितीत टाकलं आहे. एका अहवालानुसार भारतातील आयटी सेक्टरमधील वेतनवाढ थांबवण्यात येऊ शकते, तसंच कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसमध्येही कपात केली जाऊ शकते. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हे निर्णय घ्यावे लागू शकतात, असं काहींचं म्हणणं आहे.

कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना माहिती दिली
करोनामुळे कंपन्यांवर निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थिती माहिती काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. तर गुगलनंही परफॉर्मन्स रिव्ह्यू आणि प्रमोशमध्ये उशिर होऊ शकतो याची माहिती दिली आहे. अपोलो टायर्सनंही वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तर एअर इंडियानंही अनेक भत्त्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.