करोनामुळे जगभरामध्ये भितीचे वातावरण असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हाँगकाँग विद्यापिठाने केलेल्या संशोधनामध्ये डोळ्यांच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. इतकचं नाही सार्क आणि बर्ल्ड फ्लूच्या विषाणुपेक्षा १०० पटीने अधिक वेगाने नाक, तोंड आणि डोळ्यांच्या माध्यमातून करोना शरिरामध्ये पसरत आहे, असा दावाही संशोधकांनी केला आहे. ‘साऊथ चायना पोस्ट’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सार्कच्या विषाणूपेक्षा कोवीड-१९ चा म्हणजेच सार्क-२ च्या विषाणुची व्हायरस लेव्हल (संसर्ग होण्याची क्षमता) अधिक असल्याचे संशोधनामधून दिसून आलं आहे. डोळ्यांच्या माध्यमातून करोनाचा विषाणू शरिरामध्ये प्रवेश करण्याची शक्यता अधिक असल्याचेही संशोधकांनी म्हटलं आहे. ‘द लॅनसेट रेस्पीरेट्री मेडिसीन’ या जर्नलमधील अहवालानुसार हाँग काँग विद्यापिठामध्ये संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या गटाचे नेतृत्व डॉक्टर मायकल चॅन ची-वाई करत होते. डोळ्यांच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग होऊ शकतो यासंदर्भातील पुरावे सापडलेल्या संशोधकांच्या यादीमध्ये डॉक्टर चॅन यांच्या गटाचा समावेश असल्याचे ‘लॅनसेट’ने म्हटले आहे.

डॉक्टर चॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार संशोधकांनी मानवी श्वसननलिका आणि डोळ्यांच्या पेशींचा अभ्यास केला. त्यावेळी करोनाचा विषाणु कोवीड-१९ हा डोळ्यांच्या पेशी आणि श्वसननलिकेतील वरील भागातील पेशींच्या माध्यमातून शरिरामध्ये सार्क आणि बर्ल्ड फ्लूच्या विषाणुपेक्षा अधिक वेगाने प्रवेश करतो असं आमच्या लक्षात आलं. कोवीडच्या संसर्गाचा वेग हा इतर दोन विषाणूंपेक्षा ८० ते १०० पटीने अधिक आहे असंही डॉक्टर चॅन म्हणाले. या संशोधनावरुन श्वसन आणि डोळ्यांच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे असं म्हणता येईल, असंही चॅन यांनी स्पष्ट केलं.

करोनाचा संसर्ग होण्यासाठी डोळे हा महत्वाचा स्त्रोत असल्याचेही चॅन यांनी सांगितले. डोळ्यांमार्फत होणारा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी डोळ्यांना कमीत कमी हात लावावा आणि थोड्याथोड्या काळाने आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत असा सल्लाही संशोधकांनी दिला आहे. याआधी हाँग काँगमध्येच झालेल्या संशोधनात करोनाचा विषाणु स्टील, प्लॅस्टीक आणि जमीनीवर सात दिवस राहू शकतो असं दिसून आलं होतं.

करोनामुळे जगभरामध्ये आतापर्यंत (शुक्रवार, ८ मे २०२० सकाळी १० वाजेपर्यंत) २ लाख ७० हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला असून येथील १२ लाख ९० हजारहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. अमेरिकेत करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ७६ हजारहून अधिक आहे.