इटलीमध्ये करोनाने थैमान घातलं असून मागील अनेक पिढ्यांनी पाहिली नाही अशी भयंकर स्थिती सध्या इटलीत निर्माण झाली आहे. अवघी सहा कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये करोनामुळे जगभरात झालेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक संख्या आहे. करोनामुळे मरण पावलेल्यांची इटलीमधील मृत्याचा आकडा पाच हजारहून अधिक आहे. तर करोनाचा संसर्ग झालेल्यांची आकडेवारी ५० हजाराहून अधिक आहे. इटलीला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर इटलीच्या पंतप्रधानांच्या नावाने एक फोटो व्हायरल झाला आहे. देशामध्ये करोनाने घातलेलं थैमान पाहून इटलीच्या पंतप्रधानांना अश्रू अनावर झाले, असा मजकूर या फोटोबरोबर व्हायरल करण्यात येत आहे. मात्र या फोटोबद्दलची वेगळीच माहिती आता समोर आली आहे.

अनेक नेटकऱ्यांनी रडणाऱ्या व्यक्तीचा फोटो हा इटलीच्या पंतप्रधानांनी आम्ही सर्व आशाच सोडून दिल्या आहेत असं सांगितलं आणि त्यांना अश्रू अनावर झाले, अशा स्वरुपाची ‘द डेली बिहार’ नावाच्या वेबसाईटची बातमी शेअर केली. कोवीड-१९ मुळे देशात झालेल्या मृत्यूंबद्दल बोलताना इटलीचे पंतप्रधान रडले अशी बातमी या वेबसाईटने केली असून त्यासाठी रडणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो वापरण्यात आला आहे. या बातमीला हजारोच्या संख्येने शेअर्स आणि लाईक मिळाले आहेत.

मात्र हा फोटो आणि वृत्त खोटं असल्याची माहिती आता समोर आली आहे. या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती ही इटलीचे पंतप्रधान नसून ते ब्राझीलचे पंतप्रधान जेईल बोल्सोनारो (Jair Bolsonaro) आहेत. हा फोटो मागील वर्षी काढण्यात आला होता. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये बोल्सोनारो हे एका कार्यक्रमामध्ये बोलताना भावूक झाले होते, त्यावेळेचा हा फोटो आहे.

गुगल रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने शोधल्यास काही वेबसाईटने सध्या व्हायरल होणारा बोल्सोनारो यांचा फोटो डिसेंबरमधील बातम्यांसाठी वापरल्याचे दिसून येते. या बातम्यांमधील मजकूरानुसार, आपल्या कार्यालयामध्ये थँक्स गिव्हींगचे भाषण देताना बोल्सोनारो यांना अश्रू अनावर झाले होते. २०१८ साली निवडणुकांच्या प्रचारादरम्यान त्यांच्यावर झालेल्या चाकूहल्ल्यासंदर्भात बोलताना ते रडू लागले होते. एका व्हेरिफाइट युट्यूब चॅनेलवरही हा व्हिडिओ १८ डिसेंबर २०१९ रोजी पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तुम्हीच पाहा…

दुसरीकडे, कोरनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करताना किंवा कुठेही भाषण देताना इटलीचे पंतप्रधान गिसीपी काँटे हे कुठेही भावूक झाल्याचे वृत्त उपलब्ध नाही. काँटे यांनी सगळा देशच बंद करण्याची घोषणा १० मार्च रोजी केली आहे.