करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेला आग लावून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेळगावमध्ये हा प्रकार घडला असून रुग्णाच्या नातेवाईकांनी आयसीयूमधील डॉक्टरांशी गैरवर्तन करण्याचाही प्रयत्न केला. रुग्णवाहिकेला आग लागल्याचा व्हिडीओ समोर आला असून यावेळी अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीआयएमएस रुग्णालयाबाहेर हा सगळा प्रकार घडला. रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी करोना वॉर्डसमोर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला आग लावली आणि पोलिसांच्या आणि इतर गाड्यांवर दगडफेक केली. या वेळी काही जणांनी आयसीयूमध्ये जाऊन डॉक्टरांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना अडवलं. रुग्णवाहिका जळून खाक झाली असून सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त त्यागराज यांच्यासहित अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

कर्नाटकमध्ये बुधवारी सर्वात जास्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी कर्नाटकात ४७६४ करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली तर ५५ जणांचा मृत्यू झाला. यासोबत कर्नाटकमधील करोनाबाधित रुग्णसंख्या ७५ हजार ८३३ झाली असून १५१९ जणांचा मृत्यू झाला आहे.