संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणाशी संबंधित संस्थेने मानवाने जंगली प्राण्यांचे मांस खाणं सुरु ठेवलं आणि हे प्रमाण वाढतं गेल तर जगावर करोनासारख्या संकटांचे सावट कायम राहील असा इशारा दिला आहे. मांसासाठी किंवा शिकारीसाठी किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी जंगली जनावरांचा जीव घेणं, त्यांना त्रास देणं थांबवलं पाहिजे. यासाठी सर्वच देशांनी प्रयत्न केले पाहिजेत असं संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. असं केलं नाही तर करोना सारख्या प्राण्यांच्या माध्यमातून संसर्ग झाल्याने होणारे अनेक आजारांचे संक्रमण ठराविक काळानंतर वारंवार होत राहण्याची भीत संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली आहे. यासंदर्भातील वृत्त बीबीसीने दिलं आहे.

संयुक्त राष्ट्राच्या ‘यूनायटेड नेशन्स इन्वायरमेंट प्रोग्राम अॅण्ड इंटरनॅशनल लाइव्हस्टॉक रिसर्च इन्स्टिटयूट’ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये पर्यावरणाला मानवामुळे सतत होणारे नुकसान, नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापर, पाणी तसेच वायू प्रदूषण आणि जंगली प्राण्यांच्या मांसाचा वाढलेला वापर यासारख्या गोष्टींमुळे करोनासारख्या विषणूंचा फैलाव झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे. करोनासारख्या आजारांच्या फैलावासाठी आणि निर्मितीसाठी मानवच जबाबदार आहे. मानवाने नैसर्गिक नियमांचे उल्लंघन करुन आपल्या इच्छेनुसार पर्यावरण आणि सजीव सृष्टीचे शोषण करण्यास सुरुवात केल्याने करोना महामारीसारखे संकट निर्माण झाल्याचे अहवालात म्हटलं आहे.

मांस खाण्याचं प्रमाण वाढलं

“मागील १०० वर्षांमध्ये नोवल करोनाव्हायरची साथ सहा वेळा पसरल्याचे दिसून आलं आहे. मागील दोन दशकांमध्ये करोनाच्या आधीच प्राण्यांमधून मानवाला होणाऱ्या संसर्गातून झालेल्या आजारांमुळे १०० बिलयन डॉलर्सचा आर्थिक फटका आपल्याला बसला आहे. अल्प आणि अती अल्प उत्पन्न गटातील देशामध्ये २० लाखांहून अधिक लोकं रेबीज, अँथ्रेक्ससारख्या प्राण्यांच्या माध्यमातून होणाऱ्या आजाराच्या संसर्गाने मरण पावतात. अनेक ठिकाणी योग्य प्रमाणात प्रगती न झाल्याने स्थानिकांनी प्राण्यांच्या मांसावर आणि जंगली प्राण्यांवर अन्नासाठी अवलंबून रहावं लागतं. मागील ५० वर्षांमध्ये मांस उद्योग २६० टक्क्यांनी वाढला आहे. आपल्याला शेती उत्पादनांवर भर देणं गरजेचं आहे,” असं मत अवर-सरचिटणीस आणि संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या कार्यकारी संचालक असणाऱ्या इंजेर अॅण्डर्सन यांनी

पक्षींच्या माध्यमातून होत आहे विषाणूंचा संसर्ग

मागील काही वर्षांपासून प्राणी आणि पक्षांच्या माध्यमातून मानवामध्ये विषाणूंचा संसर्ग होण्याचे प्रमाणे वाढलं आहे, असं निरिक्षण संयुक्त राष्ट्राच्या आरोग्यविषयक तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. वैज्ञानिक भाषेमध्ये आशा आजारांना ‘जेनेटीक डिसीज’ असं म्हणतात. मानवाने वेळीच पावलं उचलून पर्यावरणाला आणि जंगली प्राण्यांना वाचवलं नाही तर भविष्यात करोनासारख्या अनेक आजारांचा भविष्यात सामना करावा लागेल असं पर्यावर आणि आरोग्य विषयक तज्ज्ञांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार प्रोटीनच्या वाढत्या मागणीमुळे प्राण्यांना मारलं जातं आहे. प्राण्यांच्या माध्यमातून मानवाला होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांमुळे जगभरामध्ये वर्षाला २० लाख लोकांचा मृत्यू होतो असं या विषयातील जाणकार सांगतात.

औषधांचा तुटवडा

जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) करोनामुळे एड्ससारख्या आजारांवरील औषधांचा पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. डब्ल्यूएचओच्या एका सर्वेक्षणानुसार ७३ देशांनी करोनामुळे आमच्या देशातील एड्सवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे. तर २४ देशांनी आपल्याकडे एड्सवरील औषधे अगदीच कमी आहेत किंवा त्यांचा पुरवठा नियमितपणे होत नसल्याचं म्हटलं आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे मत डब्ल्यूएचओचे विद्यमान प्रमुख डॉ. ट्रेडोस अधानन घेब्रेसस यांनी व्यक्त केलं आहे. “जगभरातील देशांना आणि त्यांच्या मित्र देशांनी एड्ससारख्या आजारांनी ग्रासलेल्यांना जीवनावश्यक औषधे कायम उपलब्ध होतील यासंदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. करोनामुळे एड्सविरोधातील युद्धामध्ये आपण मागे पडून चालणार नाही. खूप मेहनत आणि कष्टानंतर आपण एड्सवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालो आहोत,” असं घेब्रेसस यांनी म्हटलं आहे.