करोना व्हायसरमुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढत चालला आहे. बिहारमध्ये करोनाचा पहिला बळी गेला असून ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरुणाला पाटणा येथील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री तरुणाचा मृत्यू झाला. वैद्यकीय तपासणीत तरुणाला करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं होतं. हा तरुण बिहारमधील मुंगेर येथे राहणारा होता. नुकताच तो कतारमधून परतला होता.

पाटणामध्ये करोनाचे दोन रुग्ण सापडले असून यामधील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरु आहेत. यासोबत भारतात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सहावर पोहोचली आहे. याआधी शनिवारी रात्री मुंबईत ६३ वर्षीय व्यक्तीचं निधन झालं. मुंबईत करोनामुळे मृत्यू झालेली ही दुसरी व्यक्ती आहे. एच एन रिलायन्स रुग्णालयात व्यक्तीवर उपचार सुरु होते. २१ मार्च रोजी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री ११ वाजून ३ मिनिटांनी त्यांचं निधन झालं. भारतात करोनाची लागण झालेल्यांचा आकडा ३४७ वर पोहोचला आहे.

करोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून रविवारी सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता संचारबंदी पाळण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कऱण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, करोनाची एकूण ३२४ प्रकरणं समोर आली आहेत. यामधील २३ जणांवर उपचार करण्यात आले असून रुग्णालयातून घऱी पाठवण्यात आलं आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.