करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक मोठ्या शहरांमध्ये रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले नागरिकत आता घराकडे निघू लागले आहेत. पायी प्रवास सुरु असलेल्या या लोकांना वाटेत अन्न आणि पाणीही मिळत नाहीए. याबाबत विविध प्रसार माध्यमांमधून वृत्त प्रसारित होऊ लागल्यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अशा स्थलांतरीत लोकांना टोलनाक्यांवर अन्न-पाणी पुरवण्याच्या सूचना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि टोल ऑपरेटर्सना दिल्या आहेत.

गडकरींनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. यात ते म्हणतात, “मी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकारणाच्या अध्यक्षांना आणि टोल ऑपरेटर्सना सल्ला दिला आहे की, जे स्थलांतरी नागरिक सध्या मार्गावरुन आपल्या गावाकडे पायी जायला निघाले आहेत. त्यांना अन्न-पाणी अशा प्रकारची मदत पुरवा.”

यापूर्वी गडकरी यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसह सर्व प्रकारच्या वाहनांकडून टोल न घेण्याचे आदेश राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला दिले होते. त्यांनी म्हटलं होतं की, “राष्ट्रीय महामार्गांवर टोल फ्री केल्यानं देशभरात आवश्यक सामानाची ने-आण करणे सोपे होईल. तसेच संचारबंदीतून जाणाऱ्या रुग्णांना आणि गरजवंतांचाही प्रवास सोयीचा होईल.”

दरम्यान, “लोकांनी लॉकडाऊनचे पालन करावे असा आग्रह देखील गडकरी यांनी केला होता. टोल फ्रीचा निर्णय त्या लोकांसाठी घेण्यात आला आहे. ज्यांना अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडावं लागत आहे. जरी संपूर्ण देशात लॉकडाऊन असला तरी काही गरजू व्यक्तींना पास देण्यात येत आहेत. टोल फ्री केल्याने अशा लोकांचा वेळ वाचू शकेल.”