“भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाच्या टप्प्यात आहे. सरकारने हे आव्हान पेलण्यासाठी विरोधी पक्षांसोबत तज्ञांची मदत घेतली पाहिजे,” असं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलंय. देशात करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आव्हानांबद्दल त्यांना खास ब्लॉग लिहिला असून, त्यात त्यांनी सरकारला पुढील संकटाबद्दल सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे.

“२००८-०९ मध्ये आलेल्या जागतिक संकटाची नांदी रघुराम राजन यांनीच सर्वात आधी दिली होती. त्यानंतर जगातील अर्थतज्ञांनी त्यावर आपले मत व्यक्त केले होते. आताही रघुराम राजन यांना सरकारला पुढील आर्थिक आरिष्टाबद्दल जागं करण्याचा प्रयत्न केलाय आहे.  रघुराम राजन यांनी ‘Perhaps India’s Greatest Challenge in Recent Times’ या शिर्षकाने ब्लॉग लिहिला आहे.

रघुराम राजन यांनी म्हटलं आहे की, स्वातंत्र्यानंतर भारतासमोरचं हे कदाचित सर्वात मोठं संकट आहे. “२००८-०९ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटावेळी मागणीत खूप मोठ्या प्रमाणात घट झाली होती. पण तेव्हा कामगार कामावर जात होते. कंपन्या इतक्या वर्षांच्या नफ्यामुळे मजबूत होत्या. देशाची आर्थिक व्यवस्था चांगल्या स्थितीत होती. तसंच सरकारची अर्थप्रणालीही निरोगी होती. पण आज जेव्हा आपण करोना व्हायरसशी लढा देत आहोत तेव्हा यापैकी कोणतीच गोष्ट आपल्याकडे नाही,” असं रघुराम राजन यांनी स्पष्टपणे सांगितलं.

सरकारने गरिबांवर खर्च करण्यासाठी प्राथमिकता दिली पाहिजे. गरज नसलेला खर्च टाळला पाहिजे, असं मतही राजन यांनी व्यक्त केल आहे. गरिबांवर खर्च करणे योग्य पाऊल असेल असं सांगताना त्यांनी म्हटलं आहे की, “अमेरिका आणि युरोपध्ये रेटिंग खाली आली असतानाही कोणत्याही भीतीविना जीडीपीचा १० टक्के खर्च केला जाऊ शकतो पण आपण आधीच मोठ्या वित्तीय तुटीसहित या संकटात प्रवेश केला आहे आणि आपल्याला अजून अधिक खर्च करावा लागणार आहे”.

“जर आपण करोनाचा पराभव नाही करु शकलो, तर लॉकडाउननंतर काय होणार याबद्दल आत्ताच योजना आखली पाहिजे. जास्त काळासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन ठेवणं शक्य नाही. त्यामुळे आपण योग्य काळजी घेत जिथे करोनाचा फैलाव कमी आहे, अशा काही ठराविक गोष्टी सुरु करु शकतो का याबद्दल विचार करण्यास हरकत नाही,” असं रघुराम राजन यांनी सांगितलं आहे.

भविष्यासाठी ठोस निर्णय घेऊ शकतं भारत
करोनानंतरच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने योजना आखण्यास सुरुवात केली पाहिजे असं मत रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सागितलं की, जर योग्य पद्धते प्राथमिकता देऊन काम केलं तर भारताकडे असे अनेक स्त्रोत आहेत ज्यांच्या माध्यमातून या परिस्थितीतून फक्त बाहेर येऊ शकत नाही तर भविष्यासाठी भक्कम पाया तयार करु शकतो. यावेळी त्यांनी सगळी कामं पतप्रधान कार्यालयातून नियंत्रित केल्याने जास्त फायदा होणार नाही, कारण आधीच त्यांच्यावर कामाचं ओझं असल्याचं म्हटलं आहे.

अनुभवी लोकांची सरकारने मदत घ्यावी
“सध्या सरकारला खूप काही करण्याची गरज आहे. सरकारने ज्यांच्याकडे अनुभव आणि क्षमता आहे अशा लोकांना बोलावलं पाहिजे. भारतात असे अनेक लोक आहे जे सरकारला अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यात मदत करु शकतात. सरकार राजकारणाच्या सीमा ओलांडून विरोधी पक्षाची मदत घेऊ शकतं, ज्यांच्याकडे जागतिक आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा अनुभव आहे,” असंही रघुराम राजन यांनी सांगितलं आहे.

पुढे रघुराम राजन यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला प्राथमिक चाचण्यांची व्यापकता, सोशल डिस्टन्सिंग आणि क्वारंटाइनची कठोऱ अमलबजावणी करणं गरजेचं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “२१ दिवसांचा लॉकडाउन हे पहिलं पाऊल आहे. यामुळे आपल्याला तयारी करण्यासाठी चांगला वेळ मिळाला आहे. सरकार आपल्या साहसी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने लढा देत आहे आणि नागरिक, खासगी क्षेत्र तसंच सेवानिवृत्त लोकांची मदत घेण्याच्या तयारीत आहे. पण सरकारने याचा वेग अजून वाढवण्याची गरज आहे”.