कायम आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असणारे प्राध्यापक गर्ग चॅटर्जी यांचे एका वक्तव्यामुळे पुन्हा नवीन वादाला तोंड फुटले आहे. हार्वर्ड विद्यापीठमधून पीएचडीची पदवी संपादन केलेल्या आणि मुळचे पश्चिम बंगालच्या असणाऱ्या चॅटर्जी यांच्या ट्विटवर प्रसिद्ध कवी आणि आपचे माजी नेते कुमार विश्वास यांनी आक्षेप नोंदवला आहे. इतकचं नाही तर कुमार विश्वास यांनी पश्चिम बंगाल सरकारने गर्ग यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही विश्वास यांनी केली आहे. गर्ग यांनी आपल्या वक्तव्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांचा संदर्भ देत प्रत्येक राज्यामधील लोकांना त्यांच्याच राज्यात ठेवल्यास देशाचे अनेक प्रश्न सुटतील असे ट्विट गर्ग यांनी केलं होतं. यावरुन गर्ग यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

गर्ग यांनी नक्की काय म्हटलं आहे?

“बिहारमधील लोकांना बिहारमध्येच ठेवल्यास देशातील २५ टक्के समस्या सुटतील. तसेच उत्तर प्रदेशमधील लोकांना उत्तर प्रदेशमध्येच ठेवल्यास देशातील ५० टक्के अडचणी संपतील. मारवाडी व्यापाऱ्यांना राजस्थानमध्येच ठेवलं तर ७५ टक्के समस्यांचे सुटतील आणि गुजरातमधील लोकांना टेंडर आणि कंत्राट गुजरातमध्येच देण्यात आलं तर देशाच्या १०० टक्के समस्या सुटतील,” असं ट्विट गर्ग यांनी केलं होतं. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर हजारो कामगार आपल्या राज्यांमध्ये पायी चालत निघाल्याचे चित्र दिसून आले. याच पार्श्वभूमीवर गर्ग यांनी हे ट्विट केलं आहे.

या ट्विटवर विश्वास यांनी आक्षेप नोंदवला असून गर्ग यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात यावे अशी मागणी त्यांनी ट्विटर इंडियाकडे केली आहे. “बिहार, उत्तर प्रदेशच्या नागरिकांचा अपमान करुन भारतीय संघराज्यासंदर्भात लोकांच्या मनात विष कालवल्याप्रकरणी या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची गरज आहे,” अशी मागणी विश्वास यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगाल पोलिसांचे ट्विटर हॅण्डल टॅग करुन केली आहे. तसेच “कारवाई नाही केली तर देशातील एकतेच्या विरोधामध्ये हा तुमचा एक राजकीय प्रयोग आहे असाच याचा अर्थ होईल,” असा इशाराही विश्वास यांनी पश्चिम बंगालमधील राज्य सरकारला दिला आहे.

पाच हजारहून अधिक जणांनी कुमार विश्वास यांचे हे ट्विट रिट्विट केले आहे. तर अनेकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवताना विश्वास यांच्या मागणीचे समर्थन करत ही मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे.