X
X

Coronavirus: जर्मनीतील अर्थमंत्र्याने अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे केली आत्महत्या

READ IN APP

दहा वर्षापासून होते अर्थमंत्री

चीनमधील वुहान प्रांतामधून जगभरात पसरलेल्या करोना विषाणूमुळे ३१ हजारहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. युरोपीय देशांना करोनाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. जर्मनीलाही करोनाचा मोठा फटका आहे. असं असतानाच आता जर्मनीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील हेस्सी प्रांताचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांनी नैराश्येमुळे आत्महत्या केली आहे. करोनामुळे जर्मनीच्या आणि प्रांताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याने चिंतेत असणाऱ्या शेफर यांनी नैराश्येच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती हेस्सीचे प्रमुख व्होकर बौफियर यांनी दिली आहे.

शनिवारी थॉमस यांचा मृतदेह रेल्वे रुळांजवळ सापडला. ५४ वर्षीय थॉमस यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. “आम्हाला थॉमस यांच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आत्महत्या केली आहे यावर आमचा विश्वासच बसत नाहीय. आम्ही सर्वजण खूप दुखात आहोत,” असं व्होकर यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

थॉमस हे मागील दहा वर्षांपासून हेस्सीचे अर्थमंत्री होते. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल ज्या सीडीयू पक्षाच्या आहेत थॉमस त्याच पक्षाचे नेते होते. “करोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेला बसलेला फटक्यातून सावरण्यासाठी कंपन्यांना आणि कामगारांना मदत करण्यासाठी थॉमस दिवस-रात्र एक करुन काम करत होते. जर्मनीवर आलेल्या या संकटाच्या कठीण प्रसंगी त्यांच्यासारख्या नेत्याची आम्हाला खूप गरज होती”, अशा शब्दांमध्ये व्होकर यांनी थॉमस यांच्या आठवणींना उजाळा दिला.

जर्मनीची आर्थिक राजधानी असमारे फ्रँकफर्ट हे शहर हेस्सी प्रांतामध्येच आहेच. डच बँक आणि कॉमर्सबँक सारख्या बड्या बँकाची मुख्यायले या शहरामध्ये आहेत. युरोपीयन सेंट्रल बँकही याच शहरामध्ये आहे. इतक्या मोठ्या प्रदेशाच्या अर्थमंत्रीपदाचा कार्यभार दहा वर्ष संभाळणाऱ्या थॉमस यांनी आत्महत्या केल्याने जर्मनीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. थॉमस यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

जर्मनीमध्ये ५२ हजारहून अधिक जणांना संसर्ग

जर्मनीमध्ये रविवारपर्यंत करोनाचे ५२ हजार ५४७ रुग्ण अढळून आले आहेत. तर ३८९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एका दिवसात संसर्ग झालेल्यांचा आकडा तीन हजार ९६५ ने वाढला आहे. तर एका दिवसात मृत्यू झालेल्यांची संख्या ६४ ने वाढली.

21
X