करोनामुळे सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. दिवसभर घरात बसून राहावं लागत असल्याने अनेकजण कंटाळले आहेत. मात्र घानामधील महिलांना एका वेगळ्याच समस्येला सामोरं जावं लागत आहे. पती वारंवार शरीरसुखाची मागणी करत असल्याने येथील महिलांनी सरकारकडे लॉकडाउन संपवून पुरुषांना कामावर जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

घाना देशात करोनाचे ५६६ रुग्ण सापडले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशाने लॉकडाउन जाहीर केला. घानामधील एका महिलेचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ही महिला पती वारंवार शरीरसुखाची मागणी करत असून आपणास असहाय्य वाटत असल्याचं म्हटलं आहे.

११ एप्रिल रोजी Ghana MMA या वेबसाइटने ही बातमी प्रसिद्ध केली होती. वेबसाइने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक भाषेत बोलणारी ही महिला आपण घानामधील सर्व महिलांचं प्रतिनिधित्व करत असल्याचं सांगत आहे. आपला पती वारंवार शरीरसुखाची मागणी करुन हैराण करत असल्याचं महिला व्हिडीओत सांगत आहे. इतकंच नाही तर पतीला शारीरिक सुख दिल्यानंतर पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन जेवण करणं आणि इतर काम उरकण्याची जबाबदारी आपल्यावरच असल्याची तक्रार महिला करत आहे.

महिलेने आपल्या घरातून पळ काढत ऑफिस गाठलं आणि हा व्हिडीओ शूट केला आहे. महिलने व्हिडीओ शूट करण्यासाठी लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. व्हिडीओ ती सांगत आहे की, आपण नियमांचं उल्लंघन केलं आहे. पण पोलिसांनाही माझा मानसिक परिस्थिती कळली असती.

“तुम्ही सकाळी उठता तेव्हा शरीरसुखासाठी तुमची कोणीतरी वाट पाहत असतं. स्वयंपाक केल्यानंतर पती जेवतो, काही वेळासाठी टीव्ही पाहतो नंतर वारंवार शरीरसुखाची मागणी करतो. आम्ही आमच्या आरोग्यासाठी लॉकडाउनमध्ये आहोत शरीरसुखासाठी नाही,” असं महिला व्हिडीओत सांगत आहे.

महिलेने सरकारकडे पुरुषांना कामावर जाण्याची परवानगी द्यावी अन्यथा लॉकडाउन तरी संपवावा अशी विनंती केली आहे. महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.