करोना व्हायरस या महामारीने हाहाकार माजवला असून जगात एक कोटींपेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने जगात करोना महामारीची दुसरी लाट आल्याचं सांगितलं होतं. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात एक कोटी ८२ हजार ६१८ करोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. तर आतापर्यंत पाच लाख एक हजार ३०९ जणांचा करोना महामारीनं बळी घेतला आहे.

उन्हाळ्यामध्ये करोनाचा ससर्ग कमी होईल असा अंदाज लावला जात होता. मात्र, हा अंदाच साफ चुकीचा ठरला आहे. मे ते जून या महिन्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचं आकडेवारीवरून दिसतेय. जूनमध्ये जगभरात दरदिवशी सरासरी एक लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण समोर येत आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ५४ लाख ८ हजार ५२३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरं होण्याचं प्रमाण ५० टक्केंपेक्षा जास्त आहे. सध्या ४१ लाख २२ हजार ७८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत जवळपास २६ लाख जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर एक लाख २८ हजार जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेनंतर ब्राझील, रशिया, भारत आणि यूकेला सर्वात जास्त फटका बसला आहे.

ब्राझीलमध्ये १३ लाखांपेक्षा जास्त जणांना संसर्ग झाला आहे तर ५७ हजार जणांचा बळी गेला आहे. रशियात सहा लाखांपेक्षा जास्त जणांना संसर्ग झाला आहे. तर भारतामध्ये पाच लाखांपेक्षा जास्त जणांना संसर्ग झाला आहे.