देशातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे सर्वाचं लक्ष करोनावरील लसीकडे लागलं आहे. भारत सरकार करोना लस खरेदी करण्याचा विचार करत असून पहिल्या टप्प्यात ५० लाख डोस खरेदी करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारकडून करोना लस मिळण्याचा पहिला मान करोना योद्धा, भारतीय सैन्य आणि विशिष्ट श्रेणीतील लोकांना दिला जाण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारचं संपूर्ण लक्ष लसीचं पुरवठा साखळी आणि वितरणावर आहे. केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात लसीचं वितरण करण्याची योजना आखत आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत करोना लस पोहोचावी. वर्षाअखेर किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला करोना लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे.
सोमवारी करोना लस विकसित करणाऱ्या कंपन्यांसोबत झालेल्या बैठकीत नीती आयोग सदस्य व्ही के पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या ग्रुपने कंपन्यांना करोना लसची निर्मिती, किंमत तसंच सरकार त्यासाठी कसा पाठिंबा देऊ शकतं यासंबंधी प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाला देशाला संबोधित करताना करोना लसीचा उल्लेख केला होता. नरेंद्र मोदीने सध्याच्या घडीला देशात एक नाही तर तीन करोना लसींची चाचणी सुरु असल्याचं सांगितलं होतं. भारतात सध्या तीन कंपन्या करोनावरील लसीवर काम करत आहेत. या कंपन्या मानवी चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहेत. तिसरा टप्पा पार पाडण्यासाठी बराच अवधी असून ती पार पडल्यानंतर लस उपलब्ध होईल असं सांगितलं जात आहे.
भारतातील त्या तीन कंपन्या कोणत्या ?
– भारत बायोटेक आणि आयसीएमआर कोवॅक्सिन (Covaxin)नावाने लस तयार करत आहे. .
– जायडस कॅडिला कंपनीकडून ZyCoV-D नावाने एक लस तयार होत आहे.
– सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका मिळून कोविशिल्ड (AZD 1222) लसीवर काम करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 21, 2020 12:46 pm