करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरामध्ये ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी घरात रहावे आणि सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. एकीकडे करोनाविरुद्धच्या लढाईसाठी लॉकडाउन वाढलेलं असतानाच दुसरीकडे माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडांच्या नातवाचा लग्नसोहळा मोठ्या धुमधडाक्यामध्ये पार पडला आहे. आज सकाळी (१७ एप्रिल २०२०) हा विवाह सोहळा बंगळुरूमध्ये पार पडला. देवेगौडांचा नातू म्हणजेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल याचा विवाह काँग्रेसचे माजी मंत्री एम. कृष्णप्पा यांची भाची रेवती हिच्याशी झाला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सार्वजनिक ठिकाणी लोकांनी गर्दी करु नये असं आवाहन केलेलं आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. मात्र एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या या विवाहसोहळ्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे.

एएनआयने ट्वटिवरुन शेअर केलेल्या फोटोंमध्ये लग्न मंडपात लोकांची गर्दी दिसून येत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान देवेगौडा हे धार्मिक विधीमध्ये सहभागी होताना दिसत आहे. कालच कुमारस्वामी यांनी निखिलच्या लग्न सोहळ्याचा कार्यक्रम भव्यदिव्य नसेल असं सांगितलं होतं. लग्नाला केवळ १० ते १५ लोकं उपस्थित असतील अशी माहिती कुमारस्वामी यांनी दिली होती. मात्र फोटोंमध्ये अनेक लोकं या लग्नाला उपस्थित असल्याचे दिसत आहे.

हे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काही लोकांनी पोलिसांनी कारवाई करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे तर काहींनी किमान नेत्यांनी तरी सामान्यांसमोर आदर्श ठेवावा असं मत व्यक्त केलं आहे.

पोलिसांनी कारवाई का केली नाही?

व्हिआयपींसाठी नाही का?

फक्त सामान्यांसाठी लॉकडाउन

वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे नियम

श्रीमंत लोकं काहीही करु शकतात

मास्क कुठे आहेत?

सामान्यांसाठी नियम आहेत फक्त

जवळजवळ तेराशेहून अधिक जणांनी या पोस्टवर प्रितिक्रिया नोंदवला असून अनेकांनी सामान्यांसाठी नियम असतात फक्त असं म्हणत घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.