सध्या देशात करोनाचा फैलाव रोखण्याचा केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून सरकारकडून वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आपल्याकडे असणाऱ्या सुविधांचा फायदा व्हेंटिलेटर्स तयार करण्यासाठी करावा असे निर्देश दिले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) पुढील आठवड्यापासून एन-९५ मास्कच्या निर्मितीला सुरुवात करणार आहे. डीआरडीओचं दिवसाला २० हजार मास्क तयार करण्यात लक्ष्य आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, करोनाग्रस्तांसाठी देशभरातील वेगवेगळ्या रुग्णालयांम्ये १४ हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून जवळपास १२ लाख एन-९५ मास्क स्टॉकमध्ये आहेत. गेल्या दोन दिवासंमध्ये पाच लाख मास्कचं वाटप करण्यात आलं असून मंगळवारी १.४० लाख मास्कचं सोमवारी वाटप करण्यात आलं.

आरोग्य मंत्रालयाने ट्विट करत माहिती दिली आहे की, “वाहन कंपन्यांना व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यास सांगण्यात आलं असून त्यादृष्टीने काम सुरु आहे”. याशिवाय मंत्रालयाने आधीच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला ३० हजार व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्याचा आदेश दिला आहे.

नोएडा येथील आगवा हेल्थकेअरला एका महिन्यात १० हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यास सांगण्यात आलं आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांचा पुरवठा सुरु होईल. दोन स्थानिक कंपन्या दिवसाला ५० हजार एन-९५ मास्कची निर्मिती करत असून हा आकडा एका आठवड्यात एक लाख इतका जाऊ शकतो.