देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात मोठी कपात करण्याची घोषणा केली. त्यामुळे समान्यांच्या कर्जाचे हप्ते कमी होणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे. याव्यतिरिक्त कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकांना दिला आहे. त्यामुळे आता बँका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र या घोषणेच्या पार्श्वभूमीवर कर्ज घेणाऱ्या अनेकांना काही प्रश्न पडले आहेत. यामध्ये यंदाच्या महिन्यात पगारातून व्याज कापून जाणार का?, नंतर हा व्याजाचा हफ्ता कधी आणि कसा भरावा लागणार? आणि इतरही अनेक प्रश्न कर्जदार नोकरवर्गाला पडला आहे. याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न…

या महिन्यात तुमच्या पगारातून व्याजाचा हफ्ता कापून जाणार नाही का?

रिझर्व्ह बँकेने बँकांना कर्जाच्या हफ्त्यांची वसूली तीन महिने पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे. याला तांत्रिक भाषेत मोरॅटोरियम (Moratorium) म्हणजेच कर्जफेड पूढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकार असं म्हणतात. मात्र यासंदर्भात निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार प्रत्येक बँकेकडे राहणार असेल. हा सल्ला ऐकणं हे पूर्णपणे बँकेवर अवलंबून असणार आहे. रिझर्व्ह बँकेने सल्ला दिला असून हा आदेश नाही हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. बँकेने निर्णय घेतला तरी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला बँकेला हफ्ता माफ करण्यासंदर्भातील रितसर अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये करोनाच्या गोंधळामुळे आपल्या मासिक पगारावर परिणाम झाल्याचे अर्जदाराला सिद्ध करावं लागणार आहे. हा अर्ज बँकेने स्वीकारला तरच तुमच्या खात्यामधून कर्जाचा हफ्ता वजा केला जणार नाही.

हा निर्णय म्हणजे व्याजाच्या हफ्ता माफ करणं आहे की स्थगिती?

हा निर्णय म्हणजे व्याजाचा हफ्ता माफ होणार असं नाही. तुम्हाला बँकेने आता सवलत दिली तरी नंतर तुम्हाला हा हफ्ता बँक सांगेल त्या पद्धतीने भरावाच लागणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या मान्य नियमांनुसार कर्जफेड पुढे ढकलण्यासंदर्भात किंवा स्थगिती देण्यासंदर्भातील निर्णय बँका घेतील.

हफ्ता पुढे ढकललाच तर मुद्दल आणि व्याज दोघांचाही त्यामध्ये समावेश असेल का?

हो हफ्ता भरण्यासाठी बँकेने मुभा दिल्यास त्यामध्ये दोन्ही म्हणजेच मुद्दल आणि व्याज दोन्ही गोष्टींचा एकत्रितपणे समावेश असेल. बँकेने घोषणा केल्यानंतर तुम्ही येणाऱ्या हफ्त्यामधील मुद्दलेची रक्कम आणि व्याज दोन्ही गोष्टी नंतर एकत्र भरु शकता.

यामध्ये कोणत्याप्रकारच्या व्याजाचा समावेश होतो?

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या पत्रकामध्ये मुदत कर्ज म्हणजेच टर्म लोन्ससाठी हा नियम असेल असं म्हटलं आहे. म्हणजेच यामध्ये गृहकर्ज, खासगी कर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज किंवा काही वर्षांसाठी टप्प्याटप्प्यामध्ये फेडण्यात येणाऱ्या सर्वप्रकारच्या कर्जाचा समावेश असणार आहे. यामध्ये एखाद्या गोष्टीसाठी घेतलेल्या (टीव्ही, फ्रीज, मोबाईल वगैरे) कर्जाचाही समावेश असणार आहे.

मोरॅटोरियममध्ये क्रेडिट कार्ड पेमेंटचा समावेश होतो का?

क्रेडिट कार्ड हे रिव्हॉल्विंग क्रेडीट म्हणजेच फिरत्या क्रेडीट धोरणावर आधारित असते. क्रेडिट कार्ड हे टर्म लोन प्रकारामध्ये येत नाही. त्यामुळे क्रेडिट कार्ड पेमेंटचा आणि बिलांचा यामध्ये समावेश होणार नाही.

उद्योगधंद्यासाठी घेतलेल्या कर्जासाठी ही सवलत आहे का?

होय, उद्योगधंद्यांसाठी घेतलेल्या कर्जासाठी म्हणजेच रिटेल लोनसाठी ही सवलत देण्यात येणार आहे.