News Flash

हाहाकार! २४ तासांत दीड हजार मृत्यू; देशात २,६१,५०० रुग्णांची नोंद

देशातील आतापर्यंतची मोठी रुग्णवाढ

करोनामुळे दिल्लीतील परिस्थिती बिकट झाली असून, एका बेडवर दोन रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहे. (संग्रहित छायाचित्र/रॉयटर्स)

नव्या म्युटेशनमुळे करोना संक्रमणाचा प्रसार वाऱ्यासारखा होत असून, देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत असतानाच देशात नव्या विश्वविक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. भयावह बाब म्हणजे वाढणाऱ्या रुग्णसंख्येबरोबरच देशातील मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली आहे. अंत्यसंस्कारासाठी अनेक ठिकाणी मृतदेहांच्या रांगा लागत असून, महामारीचं संकट आणखी गडद झालं आहे.

पहिल्या लाटेपेक्षा करोनाची दुसरी लाट घातक ठरताना दिसत आहे. युके, दक्षिण, ब्राझील या देशात आढळून आलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेनसह डबल म्युटेशनही भारतात आढळून आलं असून, त्यामुळे परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. देशात करोना संक्रमण वेगानं वाढत असून दररोज विक्रमी रुग्णसंख्या नोंदवली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या रुग्णवाढीच्या आकडेवारीने आतापर्यंतचे २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णसंख्येचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत १ लाख ३८ हजार ४२३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशासाठी चिंतेची बाब म्हणजे मृतांच्या संख्येत २४ तासांतच मोठी वाढ झाली आहे. देशात १ हजार ५०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या १ लाख ७७ हजार १५० वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात रुग्णवाढीचा नवा विक्रम; दिवसभरात ४१९ जणांचा मृत्यू

देशात महाराष्ट्र आणि दिल्लीत करोना रुग्णसंख्येचा स्फोट झाल्यासारखीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात शनिवारी (१७ एप्रिल) दिवसभरात ६७ हजार १२३ करोनाबाधित आढळून आले. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ असून, ४१९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.५९ टक्के इतका आहे. तर आजपर्यंत ५९ हजार ९७० रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ६,४७,९३३ रुग्ण उपचार घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 9:52 am

Web Title: coronavirus highest caseload covid 19 burst in india 1494 covid death bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रुग्णालयातील ‘आयसीयू’ला आग; पाच रुग्णांचा मृत्यू
2 पूर्ण क्षमतेने लसनिर्मिती करा : पंतप्रधान
3 कुंभमेळ्यात प्रतीकात्मक सहभागी होण्याचे मोदी यांचे आवाहन
Just Now!
X